Wednesday 31 July 2019

बाहुली

ए मिने,
आहेस का घरात?
येऊ का आत?
तू काय अन मी काय आता बिझी झालो,
एकमेकींच्या घरी यायची तरी परवानगी घ्यावी लागते..

पूर्वी कसं, घरातून पळत निघालं की एक उंबरा ओलांडून धाडकन तुझ्या घरात पोहोचल्यावरच फतकल मांडून बसायचं..
तेव्हा नाही लागायची कुणाची परवानगी..

तेव्हा आपणच काय आपल्या बाहुल्या पण एकमेकिंकडे मुक्कामाला असायच्या..

त्याही आपल्यासारख्या भांडायच्या, आपणही भांडायचो..
पुन्हा पाच मिनिटांनी घर घर खेळायचो..

चूल बोळकी मांडायचो, भाजी भाकरी रंधायचो,
असलं काही कमी जास्त तर भागवा भागवीही करायचो

बाहुल्यांसाठी खाऊ करायचो, त्यांना शाळेत सोडायचो
आणि दमून तिथेच उंबऱ्यात झोपूनही जायचो..

बाहुल्या मोठया झाल्या, आपण त्यांची लग्नही लावून दिली
आपणही मोठ्या झालो, आपलीही लग्नं झाली..

आणि कळतंय का तुला मिने,
कळत न कळत आपणच बाहुल्या झालो..

शिशिर...

सध्या माझं काय चालू आहे??

सध्या आतल्या आत काहीतरी चाललंय, ते नीटसं कळतही नाही आणि सांगताही येत नाही. कदाचित आपल्या आतला शोध चालू आहे. सगळ्याच दिशांनी विचार चालू आहेत. वरवर पाहता, गाणं , वाचन चालू असलं तरी आत काहीतरी वेगळंच चालू आहे. त्याला कोणता भाव नाही, कोणतं रूप नाही ते इतकं अस्फुट आहे की शब्दात नेमकं सांगताही येत नाही.  एक मात्र कळतंय की या काहीतरी प्रसवण्या पूर्वीच्या वेणा असू शकतील.. ठीक आहे, काही नाही प्रसावलं तर षंढवेणा ठरतील..पाहू या काय होतंय...

कागद पुढे ओढवा आणि फरा फरा काही लिहावं असं सुचत नाही,
 पण डोळे तुडुंब भरलेल्या ढगासारखे कायम वर्षावाच्या पवित्र्यात...

हे कोणतं दुःख आहे जे माझ्याशी सलगी करू पाहतंय? 

ही कोणती भावना आहे जी रुसलेल्या लहान मुलीसारखी, कळते पण शब्दाचा आकार घ्यायला तयार होत नाही?

एकीकडे खूप खूप खोल बुडत चालल्याची जाणीव होतेय तर दुसरीकडे विजिगीशू वृत्ती निर्मितीचे धागे सोडून द्यायला तयार होत नाही?

एक सीमा ओलांडल्याशिवाय दुसऱ्या देशात प्रवेश नाही हे कळून सुद्धा मधल्या अवकाशात भरकटण्याची भीती का वाटावी?

शिशिर (अमृता देशपांडे)

Tuesday 30 July 2019

मन की बाते...

खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं..

ये नीर कहासे बरसे...

खरतर गेल्या काही दिवसांपासून फक्त फिजिक्सचा अभ्यास करतेय...त्यामुळे सूर्याचा जन्म, सुर्यमालेचा जन्म, ताऱ्यांचा जन्म-मृत्यू..पृथ्वीचा जन्म आणि त्यात निर्माण झालेले ऋतू यांचा अभ्यास चाललेला असताना...
काही कोटी कोटी जीवांपैकी स्वतः ला माणूस म्हणवून घेणारा एक जीव पृथ्वीवर अवतरतो आणि त्याला आपल्या भूक, भय, मैथुन आणि निद्रा या शारीरिक गोष्टींच्या पलीकडे सगळीकडे सौंदर्याचा आविष्कार दिसायला लागतो...या गोष्टीचं मला खूप खूप अप्रूप वाटत आलंय...
त्यानं फक्त कल्पनेनं सौंदर्याचे अनेक स्वर्ग निर्माण केले. त्यानं निसर्गाला सूर्य, चंद्र, झाडं, प्राणी, नद्या यांना आपली श्रद्धा अर्पण केली, त्यांना देवत्व दिलं..
त्यानं भाषा निर्माण केली. त्या माध्यमातून एकाच भावनेचे अनेकानेक पदर वेगळे करून संवाद साधला. नुसतं बोलून भगत नाही असं लक्षात आल्यावर त्यानं संगीत निर्माण केलं, त्यातून त्यानं प्रत्येक भावना उळगडल्या.
त्यानं हातात दगड, रंग, कुंचला, बोरू, पेन, पेन्सिल अशी हत्यारं घेऊन आदिम काळातच चित्रकला सुरू केली.
माणूस हा एकमेव प्राणी आहे की ज्यानं आपल्या अन्नावर संस्कार करून त्यातुन क्षुधाशांतीच नव्हे तर आनंद निर्माण केला.
थंडी वाऱ्यापासून संरक्षणार्थ निर्माण झालेलं वस्त्र आज अगणित रूपांमध्ये विकसित झालंय.
त्यानं आपल्या स्वतःला राहायला निवारा निर्माण केला पण श्रद्धाळू माणसानं त्याआधी आपल्या देवासाठी मंदिराची स्थापना केली आणि मग स्वतःला राहायला निवारा बांधला..
माणसानं केवळ उत्सुकतेपोटी विज्ञान उभं केलं. त्यात त्यानं कधी विश्वाच्या भूत-भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला तर कधी मानवी शरीरातल्या मेंदू सारख्या जटिल अवयवाचा मागोवा घेतला तर कधी अणूच्याही अंतरंगात डोकावून देवकणाच्या अस्तित्वाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला.
त्यानं अनेक ज्ञानशाखा आणि कलाशाखा निर्माण केल्या..काही शतकांपूर्वी एखादा विचारवंत त्या काळी उपलब्ध असलेलं सगळंच ज्ञान ग्रहण करू शकत होता पण आता कोणा एकाच माणसाच्या समजण्याच्या आवाक्यात नाहीत. आता एखाद्या माणसानं आयुष्यभर अभ्यास केला तर कुठे तो त्यातल्या एखाद्या शाखेतल्या एखादया भागाचा तज्ज्ञ म्हणवतो.
बाकी सगळ्या गोष्टी नश्वर असतील पण माणूस आहे तोपर्यंत या कला आणि विज्ञान अमर्त्य राहतील.
तर असा हा माणसाचा प्रचंड वेगानं चाललेला प्रवास मला कायमच आकर्षित करतो. आणि आयुष्यभर याच प्रवासातली एक पर्यटक म्हणून मी जगणार आहे. जे जे काही नितांत सुंदर असं माझ्यापर्यंत पोहोचेल ते ते माझ्या लेखणीतून पाझरेल याची आता निश्चितपणे शाश्वती वाटते.
अमृता देशपांडे

मंदिर आणि मदिरा

काल सकाळपासून, खरंतर पहाटे पासूनच कुमारांचा दुर्गा ऐकत होते. हा काही पाहाटे ऐकायचा राग नाही, पण मन की मँगोको समय की क्या पाबंदी? आणि दुर्गा सारखा आनंद देणारा राग ऐकायला तर वेळ काळ कशाला पहायची? सकाळी लिहिताना, स्वयंपाक करताना, नन्तर दुपारी वाचताना, संध्याकाळी फिरायला गेले तेव्हा सगळ्याच वेळी दुर्गा मला निखळ आनंद देत होता. मंदिराच्या गाभ्यात केशराचा सुगंध असलेलं तीर्थ प्यावं आणि त्याची चव आणि वास संपूर्ण शरीरात भिनून एक प्रसन्न पवित्र आनंद वाहत आहे असं वाटत होतं. आणि त्यातून रिमझिम पडणाऱ्या पावसानं  तर अंतर्बाह्य नितळ झाल्यासारखं वाटत होतं...
कुमार गात होते...
आमोना रे, अब रे,
बन गया मै का कहू रे..
सुरन के संग जो
समझ लो रे मै जो कहू रे...
प्रत्येक बंदीशीत कुमारांना काहीतरी गोष्ट सांगायची असते. या बंदीशीत  ते सांगतात,
आता मौन बास झालं. आतल्या आत बोलणं फार झालं, आता मी जे सुरांबरोबर नातं जोडलं आहे, त्या प्रवासात मी स्वतःच बदलून गेलोय, ते तुम्हाला सांगणार आहे. मी काय म्हणतोय ते समजून घ्यावे...
पण मग हे सांगण्यासाठी दुर्गा हाच राग योजयचं वैशिष्ट्य काय होतं?
कदाचित मी या सुरांच्या मैत्रीतून आता आनंदमूर्ती झालोय आणि जो आनंद माझ्यात पाझरतोय तो मी सर्वांना देणार आहे, असं तर कुमारांना म्हणायचं नसेल? आमोना रे ऐकताना मला तरी असं खूप वेळा वाटतं... कारण दुर्गा हा फार प्रसन्न वृत्तीचा राग आहे...ती प्रसन्न शांतता, समाधान कानातून, मनात, झिरपत राहते...

पण रात्री अपघातानंच किशोर कुमारचं
कुछ तो लोग काहेंगे, लोगोंका काम है केहेना, हे कानावर पडलं आणि पुढची संपूर्ण रात्र
चिंगारी कोई भडके, तो सावन उसे बुझाये,

मुसाफिर हु यारो, न घर है ना ठिकाना..
खिलते है गुल यहा, खिलके बिछाडने को मिलते हे दिल यहा..
हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले...
ओ बाबू...या सगळ्या माहोलात गेली, झोप येणं तर शक्यच नव्हतं... या सगळ्याच गाण्यांमध्ये आलेल्या छटा किशोर कुमारच्या वास्तव आयुष्यात आलेल्या आहेत..त्या मुळे रात्र अजूनच गहिरी होत गेली जणू काही त्याच्याबरोबर एकेका गण्यासोबत मीच एक एक पेग रिचवत होते...
कारण तीर्थ जितकं गरजेचं तीतकीच मदिरेची नशा ही.
अमृता देशपांडे
लिंक्स :
 https://youtu.be/_Sm_agM4O24

https://youtu.be/b_iSFNJmAhU

Tuesday 23 July 2019


साडी  
कधी जड भरजरी तर कधी हलकी शिफॉनची... कधी स्पेशल  डिझायनर तर कधी भारदस्त कॉटनची.. साडी ही भारतातल्या तमाम मुली- महिलांच्या मनात एक अढळ स्थान प्राप्त करून आहे. 3-4 वर्षांच्या चिमुरडीचा उलटा-पालटा पदर सावरण्याची लगबग ते पांच्याऐंशी वर्षांच्या अजीबाईंचा घट्ट कासोटा मारून नेसलेली नऊवार साडी… दोन्ही तितक्याच लोभस दिसतात. प्रत्येकीकडे कितीही साड्या असल्या तरी अजून एखादी तरी साडी कमीच असते. साड्या आणि त्यांचे प्रकार, नेसण्याची पद्धत मराठी काष्टा, गुजरातचा उलट्या उजव्या खांद्यावरून पुढे येणारा पदर, गोल गोल गुंडाळत जाणारी काश्मिरी, 'देवदास'फेम बंगाली, आणि आता सर्रास नेसली जाणारी गोल साडी..किती प्रकारे नेसली जाते साडी..शिवाय साडीचे प्रकार ते किती? पैठणी, कांजीवरम, उपाडा, चंदेरी, इकत आणि काय काय...
आपल्याकडे असलेल्या प्रत्येक साडीभोवती आठवणींचा एक गोफच विणलेला असतो.. ही पहिल्या पगारातून घेतलेली, ही लग्नातली, ही आईने दिलेली, ही डोहळ्याची, ही पहिल्या दिवाळीची, एखादी तलम साडी एखाद्या विशेष जवळच्या व्यक्तीने दिलेली असली तर तिची घडी सुद्धा तितक्याच हळुवारपणे मोडली जाते.. तर एखादी साडी सासरच्या दुष्ट नांदेणे दिली असेल तर दाखवण्यापूर्ती का होईना पण एकदा तरी धुसफूसत नेसावी लागते.
साडीचं वर्णन करताना "पदरावरती जारतारीचा मोर नाचरा हवा.." असा आईकडे गोड हट्ट धरणारी मुलगी, ते आजीच्या जुन्या पैठणीच्या स्पर्शाने आजीला पुन्हा भेटणाऱ्या शांता बाई, तर महाराष्ट्रातल्या बायकांनाच साडी कशी नेसावी याचा आदर्श घालून देणारे बालगंधर्व... सगळंच हुरहूर लावणारं...
मधल्या काळात साडी म्हणजे बकवर्ड झाली होती पण बॉलिवूडच्या तरकांनी साडी नेसली आणि पुन्हा तितकीच आवडती झाली.. साडीची एक मजा आहे, साडी हा असा एकमेव पेहेराव असा आहे की दाखवायचं म्हटलं तर सर्व काही दाखवू शकतो आणि झाकायचं म्हटलं तर सर्व काही झाकू पण शकतो..!!
साड्या इ.स.पू. २८०० ते इ.स.पू. १८०० पासून वापरात यायला लागल्या, तेव्हा सिंधू संस्कृतीचा सुद्धा भारतात विकास होत होता. तेव्हापासूनच साडी किंवा सत्तिका हा प्रकार म्हणजे बायकांचं वस्त्र या अर्थानं प्रचलित आहे. सिंधू संस्कृतीपासूनच माणूस कापसाचं उत्पन्न घेत आला असल्यानं सुरुवातीला फक्त सुती साड्या असायच्या.
साडीचा उल्लेख हा बाणभट्टाच्या कादंबरी पासून ते तामिळ साहित्यातल्या सिलापड्डीकरम नावाच्या महाकाव्यातही आडळतो.
दोन हजार वर्षांपूर्वी चीन मधून रेशीम यायला लागलं, म्हणून त्याला चिनांशुक म्हणत. त्या नन्तर साड्यासुद्धा रेशमी झाल्या. त्यांना खऱ्या सोन्या चांदीच्या तारांनी काठ पदर करवून त्या जरीच्या झाल्या. साडी विणण्याची पद्धत, त्यावरची कशिदा कारी, धाग्याचा प्रकार यावरून साडीचा प्रकार ठरतो. अपल्याकडच्या पैठणीच्या पदरावर मोर आणि पोपटाची जोडी असायलाच पाहिजे, आणि काठ बारीक चौकटींचे असतात. दागिना सिल्क अगदी मऊ तलम असते. पेशवाई मध्ये फक्त उठवदार आणि ठराविकच रंग वापरतात! चंदेरी हा प्रकार म्हणे हेमा मालिनीला प्रचंड आवडतो. साडी नन्तर येणारा महत्वाचा घटक म्हणजे ब्लाउज! कधी मॅचिंग तर कधी कॉन्ट्रास्ट, कधी साधाच तर कधी मणी, मोती, लटकन जोडलेला, कधी खोल गळ्याचा तर कधी बंद गळ्याचा.. ब्लाउज शिवायच्या सुद्धा कितीतरी तऱ्हा!! अगदी साधी, next door राहणारी मुलगी सुद्धा साडी नेसल्यावर अगदी लाखात एक दिसते! साडी शोभून न दिसणारी बाई विरळच..आणि साडी न आवडणारी तर शोधून सुद्धा सापडणार नाही! वरवर पाहता एखादी मुलगी साडी नेसणं टाळत असेल तरी छान साडी नेसून एखादा साजेसा दागिना घातलेली मुलगी पहिली तरी एकदा तरी वाटून जातंच, मीही अशी साडी नेसायला हवी होती..  आता तर म्हणे दीपिका पदुकोणच्या 'पद्मावत' सिनेमात तिनं 20 किलोची साडी आणि दागिने घातले होते म्हणे..तर साडी हा बायकांच्या जीवहळ्याचा आणि न संपणारा विषय! ना. सी. फडक्यांनी कुठेतरी म्हटलं आहे आपल्या बायकोला कधी पाहावं तर ती तल्लीन होऊन साडी नेसत असताना!!
तर तिची साडी त्याने,
तव यौवनाचा वसंत बहरे,
तयासी लोभे बघ कोकीळ हा...
या नजरेने पाहिल्याशिवाय नेसून पूर्ण होणं अशक्यच...                        

अमृता देशपांडे
amrutadeshpande.1414@gmail.com

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...