Tuesday 27 August 2019

राजाला गाढवाचे कान आहेत, राजाला गाढवाचे कान आहेत...

माझी एक आत्या आजी होती. आत्या आजी म्हणजे बाबांची आत्या, आजोबांची मोठी बहीण. तिला सगळेच अक्का आत्या म्हणायचे. कधी कधी ती आमच्याकडे राहायला यायची. फार थकली होती. मग राहायला आल्यावर आम्हाला छान छान गोष्टी सांगायची. आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या घालायची. ती आली की लवकर जेवणं करून मुद्दाम लाईट बंद करून आणि झिरोचा बल्ब लावून मिणमिणत्या प्रकाशात आम्ही सगळ्या बहिणी तिच्याभोवती कोंडाळं करून बसायचो. मग ती आम्हाला गोष्टी सांगायची. 
एक राजा होता. राजाकडे सगळं होतं. पैसा, सत्ता, सुख, शांती, समृद्धी सगळं काही होतं. फक्त एकच अडचण होती. ती म्हणजे त्याला गाढवाचे कान होते. इतर वेळी राजमुकुटाखाली ते आपोआपच झाकले जायचे. त्यामुळे प्रजेला किंवा कुणालाच ते कळणं शक्य नव्हतं. पण जेव्हा महिन्यातून एकदा केस कापायची वेळ यायची तेव्हा मात्र राजा खूप गुप्ततेनं एका निष्णात न्हाव्याला रात्रीच्या वेळी बोलावून घ्यायचा. त्याचे डोळे बांधले जायचे आणि मग राजाचे सगळे नोकर तिथून निघून जायचे आणि मग राजा एकांतात त्या न्हाव्यासमोर आपला राजमुकुट उतरवायचा. तो न्हावी मग चाचपडत चाचपडत राजाचे केस कापायचा. आणि नन्तर राजा पुन्हा राजमुकुट घालून बाहेर निघून जायचा आणि मगच त्या न्हाव्याच्या डोळ्यावरची पट्टी सोडली जायची. 
पण या सगळयामागचं रहस्य मात्र कुणालाच कळायचं नाही. एकदा तो न्हावी राजाचे केस कापून बाहेर येत असताना दारावरचा रखवालदार त्याला विचारतो. "राजा तुला नेहमी रात्रीच का बोलावून घेतो? आणि त्यातूनही तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधतो. असं का? यामागचं रहस्य काय?"
त्या वेळी त्या प्रश्नाचं उत्तर त्या न्हाव्यालापण देता येत नाही. पण आता मात्र तो त्या प्रश्नानं पुरता व्याकुळ होऊन जातो. आणि पुढच्या महिन्यात आमंत्रण आलं की काहीतरी करून डोळ्यांची पट्टी काढून काय आहे ते पाहायचं असा निश्चय करतो. तो कसाबसा एक महिना घालवतो. आणि आमंत्रण आलं की उत्सुकतेनं राजाकडे जातो. आणि केस कापताना हळूच डोळ्यावरची पट्टी काढून पाहतो तर त्याच्या लक्षात येतं, 'राजाला गाढवाचे कान आहेत!!' बस्स!! कशीबशी राजाची कटिंग उरकतो आणि बाहेर पडतो. त्याला रात्रभर झोप लागत नाही. आपल्याला हे रहस्य कळलंय हे त्याला कुणाला कळू द्यायची इच्छाही नसते आणि ते सत्य त्याच्या पोटात राहायलाही तयार नसतं. त्याचं पोट दिवसेंदिवस वाढायला लागतं आणि दिवसेंदिवस जास्त जास्त दुखायला लागतं. आता काय करावं हा विचार करताना तो एका जंगलात पोहोचतो. शेवटी एका झाडाच्या बुंध्यापाशी तो हळूच ते राजाचं रहस्य सांगून मोकळा होतो, "राजाला गाढवाचे कान आहेत. राजाला गाढवाचे कान आहेत." आणि मग तो त्या रात्री घरी जाऊन शांतपणे झोपतो. 
थोड्या दिवसांनी एक सुतार तिथे येतो आणि ते झाड कापून घेऊन जातो. त्याच लाकडाची मग तो वाजवायची पेटी तयार करतो. आणि पेटी तयार झाली की आता वाजवून पाहू म्हणून वाजवायला लागतो तर त्या पेटीतून आपोआपच आवाज येतो, "राजाला गाढवाचे कान आहेत. राजाला गाढवाचे कान आहेत." 
अत्याआजीची गोष्ट इथंच संपते पण आज मला अचानक ती आठवली आणि वाटलं आपण सगळेच कधीतरी आपले गाढवाचे कान लपवणारे राजे असतो का?
..अमृता देशपांडे

5 comments:

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...