Monday 26 July 2021

सहजच

 

खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं..

ये नीर कहासे बरसे...

खरतर गेल्या काही दिवसांपासून फक्त फिजिक्सचा अभ्यास करतेय...त्यामुळे सूर्याचा जन्म, सुर्यमालेचा जन्म, ताऱ्यांचा जन्म-मृत्यू..पृथ्वीचा जन्म आणि त्यात निर्माण झालेले ऋतू यांचा अभ्यास चाललेला असताना...
काही कोटी कोटी जीवांपैकी स्वतः ला माणूस म्हणवून घेणारा एक जीव पृथ्वीवर अवतरतो आणि त्याला आपल्या भूक, भय, मैथुन आणि निद्रा या शारीरिक गोष्टींच्या पलीकडे सगळीकडे सौंदर्याचा आविष्कार दिसायला लागतो...या गोष्टीचं मला खूप खूप अप्रूप वाटत आलंय...
त्यानं फक्त कल्पनेनं सौंदर्याचे अनेक स्वर्ग निर्माण केले. त्यानं निसर्गाला सूर्य, चंद्र, झाडं, प्राणी, नद्या यांना आपली श्रद्धा अर्पण केली, त्यांना देवत्व दिलं..
त्यानं भाषा निर्माण केली. त्या माध्यमातून एकाच भावनेचे अनेकानेक पदर वेगळे करून संवाद साधला. नुसतं बोलून भगत नाही असं लक्षात आल्यावर त्यानं संगीत निर्माण केलं, त्यातून त्यानं प्रत्येक भावना उळगडल्या.
त्यानं हातात दगड, रंग, कुंचला, बोरू, पेन, पेन्सिल अशी हत्यारं घेऊन आदिम काळातच चित्रकला सुरू केली.
माणूस हा एकमेव प्राणी आहे की ज्यानं आपल्या अन्नावर संस्कार करून त्यातुन क्षुधाशांतीच नव्हे तर आनंद निर्माण केला.
थंडी वाऱ्यापासून संरक्षणार्थ निर्माण झालेलं वस्त्र आज अगणित रूपांमध्ये विकसित झालंय.
त्यानं आपल्या स्वतःला राहायला निवारा निर्माण केला पण श्रद्धाळू माणसानं त्याआधी आपल्या देवासाठी मंदिराची स्थापना केली आणि मग स्वतःला राहायला निवारा बांधला..
माणसानं केवळ उत्सुकतेपोटी विज्ञान उभं केलं. त्यात त्यानं कधी विश्वाच्या भूत-भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला तर कधी मानवी शरीरातल्या मेंदू सारख्या जटिल अवयवाचा मागोवा घेतला तर कधी अणूच्याही अंतरंगात डोकावून देवकणाच्या अस्तित्वाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला.
त्यानं अनेक ज्ञानशाखा आणि कलाशाखा निर्माण केल्या..काही शतकांपूर्वी एखादा विचारवंत त्या काळी उपलब्ध  सगळंच ज्ञान ग्रहण करू शकत होता पण आता कोणा एकाच माणसाच्या समजण्याच्या आवाक्यात नाहीत. आता एखाद्या माणसानं आयुष्यभर अभ्यास केला तर कुठे तो त्यातल्या एखाद्या शाखेतल्या एखादया भागाचा तज्ज्ञ म्हणवतो.
बाकी सगळ्या गोष्टी नश्वर असतील पण माणूस आहे तोपर्यंत या कला आणि विज्ञान अमर्त्य राहतील.
तर असा हा माणसाचा प्रचंड वेगानं चाललेला प्रवास मला कायमच आकर्षित करतो. आणि आयुष्यभर याच प्रवासातली एक पर्यटक म्हणून मी जगणार आहे. जे जे काही नितांत सुंदर असं माझ्यापर्यंत पोहोचेल ते ते माझ्या लेखणीतून पाझरेल याची आता निश्चितपणे शाश्वती वाटते.

No comments:

Post a Comment

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...