मारवा
काल संध्याकाळच्या
सुमारासाला भिमसेनांचा एक वेगळाच मारवा ऐकायला मिळाला आणि मी एकदम आहे त्या वातावरणातून निघून दूर कुठेतरी पोहोचले. काहीतरी सतत चालू आहे, सध्या चालू
असलेला प्रोजेक्ट पूर्ण व्हायच्या मार्गावर असला तरी तो अजून पूर्णत्वाच्या खूणा दाखवत नाही, प्रयत्न करूनही काहीतरी कमी असल्याची भावना आलीये, आताच्या परिस्थितीत सगळं असूनही काहीतरी कमी आहे, सतत कशाचीतरी
आस लागली आहे, सगळं जग
वेळेच्या त्याच लयीत चाललंय आणि मी मात्र काळाच्या कुठल्यातरी बिंदूवर अडून राहिलेय ती पुढे जायलाच तयार नाही, मुठीत घट्ट दाबून ठेवलेले चार सुखाचे क्षण सोडायला तयार नाही, सगळं असूनही सतत काहीतरी राहून गेल्याची भावना सध्या मन व्यापून राहिलीये आणि अश्या मानसिक अवस्थेत भीमसेनांचा मारवा ऐकायला मिळावा.. हे तर माझंच प्रत्यक्ष रुप माझ्यासमोर ऊभं ठाकलंय.. मीच दूरवरून मला न्याहाळतीये, माझ्याच भावनांना शब्दरूपात साकार होताना मला जाणवत होतं…तोच मारवा
मी पुन्हा पुन्हा ऐकत होते, संथ लयीत सुरु केलेली आलापी, नंतर राग विस्तार आणि बंदीश आणि त्यानंतर तराणा बस्स..तेच पुन्हा पुन्हा ऐकत होते.. तरीही आपल्याकडून काहीतरी ऐकायचं राहून जातंय अशी रुखरूख लागून राहिलीये .. रात्री झोपताना उद्या उठल्यावर पुन्हा हेच ऐकू असं पक्कं ठरवून नाईलाजानं रेकॉर्ड बंद केली आणि झोपले..
पहाटे उठल्यानंतर
तोंडही न धुता आधी
कानात हेडफोन्सच्या खुंट्या ठोकून घेतल्या आणि तोच मारवा पुन्हा लावला आणि मग बाकी सगळी आन्हिकं..
दुपारपर्यंत मारवा
अगदी अंगात भिनला होता. कुमारांची काहीतरी भूमरी.. शब्द शेवटी असणारी बंदीशही आता डोक्यात घोळायला लागली होती. गीतवर्षाची सुरुवात या बंदीशीनं होते हेही नंतर आठवलं…उन्हाळा संपत
आला आहे. अंगाची काहीली
सहन होत नाहीये..उजाड जमीन, झाडांचे सुकलेले देह, माना टाकलेल्या
वेली सगळेच पावसाची वाट पहाताहेत…आणि वावटळ
सुटल्यासारखा कुमारांचा शब्द जातो…तपरीया हे
मन अत..घनारे ये
भूमरी..भूमरी…हाच सोसाटा, तीच पाववसाच्या तृप्ततेची वाट मी पहातेय…
नंतर आणखीही
पुन्हा पुन्हा अनेक मारवे ऐकत गेले मध्येच विजय कोपरकरांनी या सगळ्या अवस्थेला, मारव्यानं आणलेल्या अस्वस्थतेला एकाच शब्दात व्यक्त केलं…आणि मी
चमकलेच.. अपूर्णता.. मारवा एकच गोष्ट दाखवतो, ती म्हणजे अपूर्णता.. पूर्णत्वाच्या ओढीनं निघालेली अपूर्णता..
मारव्यात दु:खाचा भाव नाही, त्यात सुखाची ओढ आहे. सुखाच्या अभावामुळे
आलेली पोकळी आहे, ती पोकळी
हा मारवा भरुन काढतो.. आणि यातही इतकं सूख आहे की त्या सुखासाठी, त्या अपूर्णतेच्या शोधासाठी मी कायम मारवा व्हायला तयार आहे.
मारवा हा
पुरीया आणि धनाश्री यांच्या जवळ जाणारा राग आहे, पण त्या
रागांत मुर्तीमंत विरह आहे. तसा मारव्यात
त्या विरहाच्याही पलिकडे त्याच्यावर मात करुन जाण्याचा प्रयत्न आहे. मारव्यामध्ये साक्षात
सा आणि प या दोन
आधारांनाच कमी वापरण्याचा नियम आहे ! त्यामुळेच की
काय पण मारव्यामध्ये मधल्यामध्ये तरंगत राहिल्याची भावना येत रहाते. हेच जर वरच्या षड्जाकडे धाव घेतली तर तो उत्तररात्रीचा सोहोनी होतो..
याच मालिकेमध्ये
मग वसंतराव देशपांडेंचाही मारवा ऐकला. ते म्हणे चक्क सहा महिने फक्त मारवाच शिकले होते, इतका मारवा गहन आहे ! त्यानंतर अभिषेकी
बुवांच्या आधीच गहिर्या असणार्या आवाजातला मारवा तू ही अनादी, तू ही अनंत असं म्हणत त्या ईश्वरलाच मारवा अर्पण केलाय…तोही अप्रतिमच
आहे..
पण खरी
आस लावणारा मारवा ऐकावा तो किशोरीताईंचा. अस्वस्थता आणि अपूर्णता आणि पुन्हा त्यामुळे येणारी भीषण अस्वस्थता त्यांच्या बोलन बिन या बंदीशीतून मूर्तीमंत उभी ठाकते..आता पूर्ण होईल, पूर्ण होईल असं अनेकदा वाटूनही ती पूर्णता न जाणवू देता
पुरेपूर अस्वस्थता आणि व्याकूळता साकारण्यात इतकं यशस्वी कोणी झालं नसावं.. रागाची अपूर्णता तशीच ठेवून किशोरीताई मात्र इथे पूर्णत्वाला पोहोचतात. आणि आपण मात्र आताशी आपला शोध सुरु झालाय अश्या अनिमिषतेच्या गर्तेत शोधत रहातो..आपलीच स्वत:ची पूर्णता…
अमृता देशपांडे.
२४/०९/२०
खूप सूंदर
ReplyDeleteवाचला..
ReplyDeleteउत्कट आहे..
पण मला परतून यावंसं नाही वाटंत..
असो..
छान लिहीलयत 👌🏻👌🏻
ReplyDeleteकाजव्यांनी गोंदली नक्षी कुण्या झाडावरी
पावसाने नाहण्याची हौस त्याची भागली