Friday 16 August 2019

ग्रेस


ग्रेस 
गूढ, गहन, गभिरग्रेस..ग्रेसांबद्दल लिहायचं ठरल्यानंतर त्यांनी लिहिलेली किंवा त्यांच्याबद्दल लिहिलेली काही पुस्तकं मिळतात का हे बघण्यासाठी मी जवळच्याच वाचनालयात गेले आणि तिथल्या ग्रंथपालाला ग्रेसांची काही पुस्तकं असतील तर द्या असं म्हटलं त्या बाईं सहजच ग्रेस खरंच मोठे कवी होते नं? असं म्हटलं. पण मला मात्र ग्रेस अजून गेले कुठे, ते आहेतच की अजून. असा उगाचच एक भास होऊन गेला. नंतर विचार करताना तो भास नव्हता असंही जाणवलं, कारण ग्रेस आहेतच की प्रत्येक माणसात! कारण ग्रेस ही काही नश्वर व्यक्ती नव्हे..तो एक विचारांचा, अभिव्यक्तीचा, कल्पनेचं बंड करणारा आणि स्वत:ला माणसाच्या सुखापेक्षा दु;खाचा प्रतिनिधी मानणारा अखंड कोसळणारा प्रपातच आहे!!
असं म्हणण्याचं कारण म्हणजे ते स्वत:च स्वत:ला दु:खाचा महाकवी म्हणतात. ते म्हणतात,
मी महाकवी दु:खाचा, प्राचीन नदीपरी खोल,
दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल
मी पुरुष असताही तू बिल्वर मजला भरले,
करुणेच्या सर्व कळांचे डोहाळे मज लागले..
या ओळी वाचताना, दु:खातूनही समरसून जगताना, दु:खाच्या दगडाचे याचकाला मात्र नेहमी आनंदाच्या फूलात रुपांतर करुन देणार्या राधेयाची आठवण होते.. !!
खरंतर ग्रेस हा काही समोर दिसेल ती वस्तूस्थिती यमकं जूळवून लिहीणारा कवी नाही. त्यांच्या अभिव्यक्तीचा प्रकारच पूर्ण वेगळा आहे. त्यांच्या उपमा, त्यांची शब्दयोजना आणि त्यांच्या कल्पना या खोल अंतरात्म्यातून घूमल्यासारख्या प्रतिध्वनीत होत होत शब्दरूप घेऊन आपल्यापतर्यन्त पोहोचतात तेव्हा त्यांची एक गूढरम्य कवीता झालेली असते.
त्यामुळे ग्रेसांच्या कवितेचा काही एकच असा अर्थ कधी निघत नाही. प्रत्येकाला तो आपापल्या कुवतीप्रमाणे उलगडत जातो. त्यामुळे मला सुरुवातीला अश्या दुर्बोध वाटणार्या माणसात असामान्य कवी आहे हे कोणी ओळखलं असेल? आणि या माणसातलं कवित्व जगासमोर आणणार्या माणसाची प्रज्ञा आणि मेधा किती प्रचंड विस्तारलेली असेल असे बाळबोध प्रश्न मला नेहमी पडायचे. एका ठिकाणी त्याच माणसानं खुलासा केला आहे.
मी असा एकदा नागपूरच्या रस्त्यावरनं जात होतो. तेव्हा समोरुन दोन माणसं येताना दिसली. त्यातला एक पायानं अधू होता आणि तो दुसर्याचा आधार घेऊन जात होता. मी त्या दोघांशी बोललो तेव्हा त्या दोन महारथींची नावं सुरेश भट आणि माणिक गोडघाटे असल्याचं कळलंत्यानंतर मी त्यांना काही कवीता मागितल्या आणि मीच त्या कवितांना चाली लावणार होतो.
 त्यातले माणिक गोडघाटे म्हणजेच आपले कवी ग्रेस आणि हा प्रसंग सांगणारे संगीतकार म्हणजे आपले लाडके  पंडित हृदयनाथ मंगेशकर हे होते!!

माणिक सीताराम गोडघाटे उर्फ ग्रेस यांचा जन्म १० मे १९३७  रोजी नागपुरात झाला. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर
या गावचा माझा जन्म, माझी नाळ तोडून याच गावच्या मातीत गाडली गेली. इथे माझे शिक्षण झाले. बाकीच्या सगळ्या वयाच्या, आयुष्याच्या आत्तापर्यंतच्या परिक्रमा ईथेच सुरु आहेत. ईश्वराची कृपा हा माझ्या जगण्याचा मुलाधार आहे. मी सकाळी ४ वाजता उठतो आणि पोहायला जातो, जेव्हा कुणालाही जाग आलेली नसते तेव्हा मी पोहून परत आलेला असतो. कारण मला लिहायचं असतं, मला माझ्या प्रार्थना उभ्या करायच्या असतात. मी म्हणतो, “माझ्या तथाकथित निर्मिती विश्वावर जीव जडवणार्या प्रत्येक स्त्री-पुरुषाला सुखाचे ठेव. आणि देवा जर जमले तर या माझ्या निमुळत्या, छोट्याश्या बालमुठीतल्या प्रचंड आणि इवल्याश्या कवितेवर जगात कुणालाही मात करु देऊ नकोस. देवा त्याबरोबरच माझ्या सभ्यपणावरही कुणालाच मात करु देऊ नकोस.. poetry is not my achievement.How poetry will be my achievement my dear friends and my der enemies? Had it been my achievement then दोन ग्रेस झाले असते तीन ग्रेस झाले असते..पण ग्रेस एकच आहे.
हे ही दुर्बोध आहे का हो? महणजे गेली ३५ वर्षे महाद्वाराने आणि मागच्या दाराने माझी कविता गुणगुणता  आणि मलाच काहीतरी डोळे वटारुन का पहाता मेलं? सात पुस्तकं लिहिली तरी मी भाषण देऊन स्पष्टीकरणच देऊ का? हे मला नाही कळत. हा काय मतलब आहे मला कळतच नाही. माझ्या पेशींचे तुकडे पडत गेले , माझ्या हृदयातलं रक्त झडत गेलं आणि तुम्हाला कुठलीही झुळूक जखम करत नाही..याला काय अर्थ आहे?”
मला स्वत:ला भाबडेपणाने असे वाटते की कवीचे जगणे आणि त्याचे तथाकथित लिखणे यातून त्याच्या शरीराची आणि तितकीच त्याच्या आत्म्याची झीज होत असते आणि काहीवेळेला हा आघात आणि स्फोट जर जबरदस्त असतील तर त्याचे तुकडेही पडत असतात. ती झीज आणि पडलेले तुकडे पुन्हा जोडता येत नाहीत. असा माझा समज आहे.

शेवटच्या काही दिवसांत ग्रेस पुण्यातच दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात होते. तेव्हा त्यांना अमेरिकेत रहात असलेला एक मराठी मुलगा भेटायला आला आणि त्यानं खूप प्रेमानं ग्रेसांना अमेरिकेला त्याच्या घरी रहायला यायचं आमंत्रण दिलं. त्यावर ग्रेस म्हणाले मी नक्की येईन अमेरिकेला, जगायला नाही मरायला!! त्या मुलाला काही कळेना, मरायला येईन हा काय प्रकार आहे? यावर ग्रेसांनीच खूलासा केला..या भुमीचे माझ्यावर इतके उपकार आहेत की मी इथे मरु इच्छित नाही. या प्रसंगी ग्रेस कवितेतून काय म्हटले असते?
भळभळती जखम माझ्या भाळावर अश्वथाम्यासारखी,
संध्याकाळचा तो एकाकी निरवपणा माझ्या माथ्यावर,
दु:खाचे ते बुडून विरुन जाण्याचे  अलोट क्षण माझ्या शीरावर,
पण मी त्या दु:खाचा पर्वत पार करुन तुझ्या दारी आलोय,
तू मला इतकं दिलयस,
तुझे इतके उपकार आहेत माझ्यावर,
तू मला तुझ्या भूमीवर प्रसवलंस,
माझ्या कवितांना प्रसवलंस,
तुझ्या मुशीतून ग्रेस जन्माला घातलास,
तुझे इतके उपकार आहेत माझ्यावर,
की हे मराठी माते,
मी तुझ्या भुमीवर मरु इच्छित नाही!!

२६ मार्च २०१२ या दिवशी ग्रेस यांना याच ठिकाणी परलोकाचं आमंत्रण आलं आणि ते म्हणून गेले
मी खरेच दूर निघालो, तू येऊ नको ना मागे..



  ….अमृता देशपांडे
     amrutadeshpande.1414@gmail.com


2 comments:

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...