Thursday 15 August 2019

अन्न


अन्न
माणसाच्या अन्नाच्या प्रवासाबद्दल जे काही आतापर्यंत वाचलंय, त्यावरून काही गोष्टी कळल्या. माणसाची उत्क्रांती  आणि त्याच्या बरोबर निसर्गामध्ये झालेले बदल, हिम पर्व ते ऋतूंची निर्मिती, एप ते माणूस हे तिन्ही प्रवास काळाच्या साधारणतः एकाच टप्यात घडत गेले, एकमेकांना पूरक ठरले. 
साधारणतः ९-१० हजार वर्षांपूर्वी माणूस निसर्ग, पाऊस पाणी, सूर्य-चंद्र- पृथ्वी यांचं परिभ्रमण यांबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होता. त्यामुळे कोसळणारा पाऊस, लकाकणाऱ्या विजा, सूर्याचं उगवणं- मावळणं, या गोष्टींचं त्याच्या मनात कुतुहुल होतं तसंच या निसर्गशक्तीची भीती सुद्धा होती. या भीतीतूनच मग कोणीतरी अज्ञात शक्ती हे सर्व घडवून आणते असा विश्वास दृढ होत गेला आणि जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना सुरू झाल्या. यातूनच पुढे अनेक धर्म निर्माण झाले. तेव्हा उजेडाचं आकर्षण होतं, तसंच अंधाराची भीतीही होती. अंधार पडला, सूर्य मावळून गेला की सगळं जीवनच ठप्प होत असावं; आणि चमत्कार झाल्याप्रमाणे दुसरा दिवस उजाडला की आनंदी आनंद!! दिवसाचा वेळ जेवढा तेवढाच कामाचा, जागं राहण्याचा वेळ.  माणूस फळं, कंदमुळं, बेरीज, लहान लहान कीटकं असं काहीही खात होता पण मुख्य अन्न हे शिकारीवर अवलंबून होतं. त्या काळीसुद्धा लिंग आणि वयानुसार श्रमविभागणी झाली होती. स्त्रिया, लहान मुले आणि वृद्ध माणसे  वस्तीच्या जवळपास फळं आणि लहान सहान कीटकं गोळा करायची. पुरुष मात्र दिवसभर शिकार करायला जायचे. जी शिकार मिळेल ती संध्याकाळी सगळे मिळून  समारंभपूर्वक खायचे. यातूनच 'डिनर'चा उगम झाला. डिनर म्हणजे कामाचा दिवस संपल्यावर संध्याकाळी, सर्वांनी मिळून भरपेट करायचे जेवण!  त्यांनतर अंधार पडल्यावर माणूस काहीच करू शकत नसायचा. त्यामुळे एका जागी शांतपणे झोपणं किंवा बसून राहणं याशिवाय पर्याय नव्हता. उजाडलं की ब्रेक फास्ट! त्या काळी खरोखरच रात्रीचा उपास घडत असणार आणि हा उपाशी राहण्याचा कालावधी मोठा असणार. म्हणून उजाडल्यावरच्या खाण्याला ब्रेकफास्ट म्हटलं गेलं असावं. ब्रेकफास्ट म्हणजे आधल्या रात्री जे काही मांस उरलेलं असेल ते आणि त्या सोबत गोळा केलेली फळं इत्यादी. हा ब्रेकफास्ट करून माणसं पुन्हा शिकारीला निघत, स्त्रिया गॅदरिंग म्हणजे गोळा करण्याच्या, जमवून ठेवण्याच्या कामाला लागत. हे करतांनाच स्त्रियांनी बियांपासून झाडं कशी उगवतात, त्यांना परत फळं कशी येतात हे निसर्गाचं निरीक्षण करून समजून घेतलं. यातूनच माणसाचा पहिला सृजनाचा आविष्कार म्हणजे शेती चा उगम झाला! म्हणजे पहिली शेतकरी ही स्त्री होती!!  मधल्या काळात म्हणजे आठ हजार वर्षांपूर्वी माणसाला आगीचा शोध लागला. ही आग माणसाला उजेड आणि ऊब द्यायची! माणसाचं हिंस्त्र श्वापदांपासून संरक्षण करायची. त्यातूनच अन्न कधीतरी आगीत भाजून खाल्लं गेलं आणि 'पाककला' विलक्षण गोष्टीचा उगम झाला. पण याच आगीमुळे माणसाचा जागं राहण्याचा वेळ वाढला. त्यातूनच मग ब्रेक फास्ट आणि डिनर यांच्या मध्ये काहीतरी खाण्याची गरज निर्माण झाली. या दुपारच्या वेळी सगळे कामात असतात पटकन काहीतरी सुटसुटीत खाऊन परत कामाला लागायचं असतं. तेव्हा आकाराने मोठे, सूप सारखे पातळ पदार्थ टाळून, सँडविच, बर्गर, पिझ्झा, पेस्टी (पेस्ट्री नव्हे), सारखे हात जास्त खराब न होता, उभ्या उभ्या किंवा कामाच्याच टेबलावर  बसून काम करता करता खाण्याचे पदार्थ निघाले असावेत. सतराव्या शतकात याला 'लंचॉन' हे नाव मिळालं. काळाच्या ओघात ते नाव सुद्धा माणसाने सुटसुटीत करून 'लंच' करून टाकलं!! आता ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे खाण्याचे प्रकार नियमित झाले होते, सगळीकडे accept झाले होते. मध्ये नवव्या शतकात कलदी नावाच्या मेंढपाळाला कॉफीचा शोध लागला होता आणि सगळ्या जगाला दारू आणि पाणी यांच्याशिवाय एक चांगलं स्फुर्तीदायक पेय मिळालं होतं! नन्तर सकाळी उठल्यावर मरगळ घालवण्यासाठी कॉफी प्यायला सुरुवात झाली. चहा तर इसवी सना पूर्वी दोन हजार वर्षांपासून चीन मध्ये पिला जात होता. तिथून तो सगळीकडे पसरला. अठराव्या शतकांनंतर जीवनाने सगळीकडेच वेग घेतला होता. अनेक शोध लागत होते. चाक, सायकल, गाड्या, वाफेचं इंजिन, वाचन- लिखाणाची मध्यमं, करमणुकीची साधनं वाढत होते. हिंदुस्थान, चीन, इजिप्त मध्ये अनेक संस्कृती उदयाला येत होत्या. कला, शास्त्र, तत्वज्ञान, मॅनेजमेंट या गोष्टींनी माणसाच्या जीवनाला अनेक पदर मिळत होते. जीवन म्हणजे 'फक्त जिवंत राहून वेळ व्यतीत करणं' ही आदिमानवाची कन्सेप्ट केव्हाच मागं पडली होती. माणसाचे एका दिवसात सक्रिय राहण्याचे तास वाढत चालले होते. १८०० साली विजेच्या दिव्याचा शोध लागला. आता माणूस रात्री जास्तच सक्रिय राहू लागला होता. तशी डिनरची वेळ पुढे पुढे चालली होती. आधी सूर्यास्ताच्या सुमारास होणारं डिनर आता ८ -८:३०वाजता व्हायला लागलं. त्यामुळेच मग लंच आणि डिनर च्यामध्ये काहीतरी खायची गरज निर्माण झाली. इंग्लंडचा ड्युक ऑफ बेडफोर्ड फ्रान्सिस रसेलची बायको अँना मारिया हिला सुद्धा भुकेने वेड लागायची वेळ यायची. यावर तोडगा म्हणून तिने १८३९साली तिनं आपल्या नोकरांना दुपारी पाच वाजता चहा आणि त्या बरोबर काही केक रोज वाढायला सांगितलं. हीच 'हाय टी' ची सुरुवात. म्हणजे आपण रोज सकाळी उठल्यावर चहा पितो, नाष्टा मग दुपारचं जेवण, दुपारचा चहा आणि रात्रीचं जेवण करतो त्यामागे इतका मोठा इतिहास असेल असं वाटलं होतं
आत एकविसाव्या शतकात माणसाला दिवसाचे चोवीस तास सुद्धा अपुरे पडायला लागलेत.. म्हणूनच की काय आजचे आहारतज्ज्ञ दर दोन तासांनी खायचा सल्ला देतात....

No comments:

Post a Comment

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...