Wednesday 14 August 2019

पुरीया धनाश्री...


पुरीया धनाश्री...

सकाळपासून काम, घाई गडबडीचं सुरू झालेलं अव्याहत चक्र संध्याकाळ व्हायला लागली की थोडं रेंगाळतं. शरीराबरोबरच मनालाही थोडासा थकवा आलेला असतो. सगळ्यांचं सगळं करता करता कधी आनंद होतो पण बऱ्याचदा आपल्याला काय पाहिजे होतं तेच विसरायला होतं! या सूर्य कलण्याच्या वेळी, आपापल्या घरी जाण्याच्या वेळी, आभाळ संधीप्रकाशानं भरून जाण्याच्या वेळी ऐकायचा हा राग..

आजरा दिन डुबा
अब तू ध्यान धरिलो रे ।।
साँज आई घेरी है
रंग जो चाहे भरिलो रे ।।

 पंडित कुमार गंधर्वांनी ही बंदिश ग्रीष्मातल्या संध्याकाळसाठीच योजली होती.
आता दिवस मावळतीला आला आहे. केलंस नं दिवसभर काम, दगदग केलीस. आता जरा शांत बस, एकाग्र हो. स्वतःच्या आत काय चाललंय ते बघ जरा. दिवसभर सगळ्यांच्या मागण्या पुऱ्या करता करता तुला स्वतःला नेमकं काय पाहिजे हे विचारलंस का कधी स्वतःला? आता विचार. बघ ती ग्रीष्मातली संध्याकाळ तुला काहीतरी देतेय, जणू आभाळाचा रिकामा कॅनव्हास तुझ्यापुढे अंथरलाय जो पाहिजे तो रंग भर..सगळं तुझ्या हातात आहे. जरा शांत होऊन विचार तर करून बघ!!!
हेच तर त्या पुरीया धनाश्री ला सांगायचं नसेल?? असा विचार गेले अनेक दिवस मन व्यापून होता. 

पण सगळ्यात पहिल्यांदा जो पुरीया धनाश्री ऐकला होता त्यांनतर अगदी वेडच लागलं होतं. त्याचं वर्णन मी कधी तरी लिहून ठेवलं होतं...
"आता अगदी अमृता प्रीतम सारखं झालंय माझं. स्वयंपाक करताना अचानक काहीतरी सुचतं आणि मग लिहायची उर्मी शांत बसू देत नाही. जे मनात आलं आहे ते कागदावर उतरवल्याशिवाय शिवाय चैनच पडत नाही. हातातलं काम पूर्ण करू आणि मग लिहू म्हटलं की तेव्हा सुचलेल्या कल्पना तितक्याश्या मोहक वाटत नाहीत. त्यामुळे आता तशीच बसलेय लिहायला, स्वयंपाक अर्धवट टाकून...
संध्याकाळचे ६-६:३० वाजले आहेत. भीमसेनांचा पुरीया धनाश्री चालू आहे, त्या तालावर माझं भाजी चिरणं, पोळ्या लाटणं चालू आहे. हा राग ऐकायची हीच खरी वेळ. ते ऐकण्यात मी इतकी दंग होऊन गेले होते की मला हे गाणं नसून एक पंचेंद्रिय व्यापून टाकणारा एक अनुभवच वाटला. 
गाणं संपलं आणि काही सेकंदानी मला अचानक उन्मळून रडूच यायला लागलं. रडण्याचा पहिला भर ओसरल्यावर मलाच प्रश्न पडला का रडत होते मी? अं? आठवेचना काय झालंय...मग लक्षात आलं, भीमसेनजींच्या पुरीया धनाश्रीनं एव्हढी प्रचंड हुरहूर आणि ओढ लावली होती की मला जीवाच्या जीवलगाची ताटातूट झाल्यासारखंच वाटलं! खरंतर हा योग्य वेळी योग्य ते आणि महान ताकदीच्या गायकाचं गाणं ऐकल्याचा परिणाम होता!! 

फार पूर्वीपासून पुरीया धनाश्री मला सूर्यास्ताच्या वेळेस प्रियकराची वाट बघणाऱ्या विरहिणीसारखा वाटत आलाय. संध्याकाळची वेळ आहे. ती हिरवी नऊवारी नेसून, वेणी-फणी करून वाड्याच्या दारात उभी आहे. दाराच्या शेजारच्या पंचकोनी कोनाड्यात तिनं दिवा लावला आहे. त्या प्रकाशात दाराचे पितळी कडी-कोयंडे, सागवानी पॉलिश चमकतंय. आकाशात केशरी-कातर रंग पसरलाय. तोच रंग तिच्या आरक्त, वाट पाहणाऱ्या चेहऱ्यावर उतरलाय. डोळे दूरदूरपर्यंत कोणालातरी शोधताहेत. वाऱ्याच्या मंद झुळुके बरोबर तिच्या केसांची एक बट गालावर रेंगाळतेय. ती तशीच उभी आहे, एका दाराला रेलून, त्याची वाट पाहत ओढीनं... अजूनही पुरीया धनाश्री!!!"


14 comments:

  1. पुरीया धनाश्री...कातरवेळ...तुझी शब्दबद्धता अप्रतिम अमृता...

    ReplyDelete
  2. पुरीया धनाश्री...कातरवेळ...तुझी शब्दबद्धता अप्रतिम अमृता...

    ReplyDelete
  3. Simple pan mannala chaan vatnara .... Keep writing... Lots of love ...

    ReplyDelete

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...