Tuesday 13 August 2019

कुमार गंधर्व: एक सृजनयात्रा


कुमार गंधर्व: एक सृजनयात्रा

     कुमारांबद्दल लिहायला मी काही शास्त्रीय गायिका किंवा संगीत विश्लेषक नाही आणि त्यांच्या जीवनकहाणीबद्दल लिहिणं तसं काही नवीन नाही, अनेकांनी अनेक प्रकारे त्यांच्याबद्दल लिहिलंय, संशोधन केलंय. तरीही मला स्वतःला कुमार कसे दिसले, का भावले, ते सांगायचा हा एक प्रयत्न.
     पंडित कुमार गंधर्व किंवा नुसतंच कुमार म्हटलं तरी अजूनही एक अनामिक प्रकारचं गूढ आकर्षण वाटतं. कितीही ऐकलं तरी प्रत्येक वेळी काहीतरी नवं गवसतं. चला, आता घरंदाज घराण्यातल्या या गायकाचा हा ‘घरंदाज’ राग ऐकू किंवा अमुक एक गाणं फार नावाजलं गेलंय म्हणून आपणही तेच ऐकू, तेच ग्रेट, बाकीचे स किस झाड की पत्ती... हा अॅटीट्युड बाळगून गाणं ऐकायला गेलं की संपलंच सगळं. मग त्यातली कला सोडून माणूस शास्त्राच्याच मागे लागतो. गाणं ऐकताना माझी पाटी कोरी असते. गाणं ऐकताना आपण त्यात समरस होऊ शकलो, त्यातले भाव आपल्यापर्यंत पोहोचले, अगदी भिडले, तर ते खरं गाणं, या पेक्षा वेगळा निकष मी मानत नाही. जे साहित्य, संगीत, कला, अंतर्मुख करते, मनात भावनांचं अत्युच्च शिखर गाठवते, तेच खरं साहित्य, संगीत किंवा कला. कुमारांचं गाणं ऐकताना ही एकतानता अनेक वेळा अनुभवायला येते.
     त्यांच्याच शब्दात सांगायचं तर “गाणं ही अशी कला आहे की, जी गोष्ट इतर कुठल्याच माध्यमाने सांगता येत नाही ती गाण्याने सांगता येते आणि हे मला पूर्णपणे पटलेलं आहे....” म्हणूनच त्यांच्या गाण्यातून असंख्य भावतरंग उमटू शकतात!!
कोण होते हे कुमार गंधर्व?
     शिवपुत्र सिद्धरामैया कोमकली या मुलाचा जन्म ८ एप्रिल १९२४ ला बेळगाव जवळच्या सुळेभावी नावाच्या गावात झाला. दोन मोठ्या भावांनंतरचं हे तिसरं अपत्य! वडिलांना गाण्याची आवड होती. दोघे मोठे भाऊ गाणं शिकत होते. वयाच्या ७व्या वर्षा पर्यंत शिवपुत्राने गाण्याबद्दल काहीही व्यक्त केले नाही. आवडही नाही आणि नावडही नाही, आणि सातव्या वर्षी एकदम गायलाच लागला..तेही शास्त्रीय संगीत!! दोन तंबोऱ्यांच्यामधेच जाऊन जाऊन बसला तो!! आणि गायला काय लागला तर... त्या काळातल्या अनेक नामवंतांची गाजलेली शास्त्रीय गाणी, भजनं, आणि बंदिशी!! ७ वर्षांचा हा मुलगा अब्दुल करीम खाँ, रहिमत खाँ, हिराबाई बडोदेकर यांच्या गायकीची सही सही नक्कल करतो अशी ख्यातीच झाली होती.. मग अनेक मैफिलींमध्ये त्याची गाणी होत. त्याच दरम्यान गुरुकमळस्वामींना त्याने गाणं ऐकवलं तेव्हा त्यांनी याला “ये कुमार, गंधर्व है|” असं म्हणून ‘कुमारगंधर्व’ अशी पदवीच सुवर्णपदकावर कोरून दिली होती! आता तर हा कुमार प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता. गाणं कितीही अवघड असो, कुमारांना ते गाणं कधीही अशक्य नसे. अनेक मैफिली ते आता करायला लागले होते. त्यांच्या कार्यक्रमाच्या पेपर मध्ये बातम्या, जाहिराती यायच्या. अनेक दिग्गज लोक याचं गाणं ऐकायला यायचे. पेटी, तबला वादक, तंबोरा घेऊन बसणारे अशी त्यांची ‘कुमार गंधर्व संगीत पार्टी’ नावाची टीमच होती!!  
     १ मार्च १९३६ रोजी मुंबईच्या जीना हॉल मध्ये झालेली एक मैफल मात्र फारच महत्वाची ठरली. कारण यात प्रेक्षकांमध्ये खूपच महत्वाचे लोक बसलेले होते. त्यापैकीच एक होते, इंडियन स्कूल ऑफ म्युझिकचे संस्थापक आणि प्रसिद्ध संगीत शिक्षक बी. आर. देवधर. त्यांनी कुमारचं गाणं ऐकलं आणि ते त्यांच्या वडिलांशी बोलले. आज हा मुलगा प्रसिद्धीच्या शिखरावर आहे, उद्या काय? अशी नक्कल कितीही केली तरी ती शेवटी नक्कलच, असं किती दिवस चालणार? अजून ४/५ वर्षात याचा आवाज फुटेल तेव्हा कशी करणार नक्कल? याला खरंच गाण्यात काहीतरी करायचं असेल, इतक्या चांगल्या टॅलेंटचं चीज व्हायचं असेल तर त्याला नीट गाणं शिकवा, माझ्याकडे पाठवा. त्यानंतर याची वर्णी लागली इंडियन स्कूल ऑफ म्युझिकमध्ये. इथे त्याचं खरं शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरु झालं. देवधरांचं एक वैशिट्य म्हणजे त्यांचा भारतीय शास्त्रीय संगीताव्यतीरक्त इतर देशांतल्या संगीताचा सुद्धा तितकाच अभ्यास होता. ते मूळचे ग्वाल्हेर घराण्याचे गायक पण त्यांच्या क्लास मध्ये भारतातल्या सगळ्या घराण्याचे सगळे दिग्गज गायक येऊन गायचे. देवधर या सगळ्या दिग्गजांना त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवायला लावत असत. त्यामुळे कुमार अनेकांकडून अनेक गोष्टी शिकले. सगळ्याच घराण्यांची गायकी शिकले. तिथे त्यांना विशाल दृष्टीकोन मिळाला. कुमारांची गायकी प्रगल्भ झाली.
     त्याचीच एक गोष्ट, एकदा ते विदुषी अंजनीबाई मालपेकरांकडे गेले होते. त्या फार महान गायिका होत्या पण आपलं गाणं ऐकण्यापेक्षा लोक आपल्याला बघायला येतात असं लक्षात आल्यामुळे त्यांनी वयाच्या २५व्याच वर्षी जाहीर मैफिलीत गाणं सोडून दिलं होतं. त्या कधीकधी कुमारांना शिकवत असत. त्या दिवशी अंजनीबाई कुमारांना शिकवताना अस्वस्थ होत्या, कुमारांनी विचारलं, “माई काय झालं?” त्या म्हणाल्या, “अरे हा शुद्ध मध्यम मला हवा तसा लागत नाहीये” कुमारांना तर तसं काहीच वाटत नव्हतं. माई छानच गात होत्या. माईंनी त्यांना दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं. दुसया दिवशीही हाच प्रकार!! असं सलग चार दिवस झालं... चवथ्या दिवशी माईंचा तो मध्यम असा काही लागला, की माई, कुमार आणि तिथे असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात घळघळ पाणीच आलं!!! त्या दिवशी कुमार स्वर परफेक्ट कसा लावायचा हे शिकले. त्यानंतर त्यांनी सर्वच स्वर असे लावायचा ध्यासच घेतला.  
     देवधरांकडे शिकायला सुरुवात करून आता १० वर्षे झाली होती. आता पुन्हा कुमार मैफिलीत गायला लागले होते. १९४७ साली त्यांनी कराचीच्या भानुमती कंस या आपल्याच सहाध्यायीशी लग्न केलं. सगळं छान चाललं होतं. भारतभर त्यांना प्रसिद्धी मिळत होती आणि १९४८ साली कलकत्याची एक मैफल करून येत असतानाच त्यांना प्रचंड खोकला सुरु झाला, ताप आला.... आणि TB डीटेक्ट झाला. अगदी जीवावर बेतणारा!! आत्ता कुठे देवधरांकडचं शिक्षण संपलं होतं, मुक्तपणे ते गाणं करायला लागले होते. वयाची २४/२५ वर्ष म्हणजे एखाद्या गायकाच्या करियर मधला महत्वाचा टप्पा. आता गाणं थांबवायचं म्हणजे त्यांचा श्वासच बंद करण्यासारखा होतं. डॉ. मधू देशमुखांनी त्यांना सक्तीची विश्रांती तर सांगितलीच पण एखाद्या कोरड्या हवेच्या ठिकाणी जाऊन राहायला सांगितलं. मुंबई सोडायला सांगितली. त्याप्रमाणे कुमार भानुसहित मध्य प्रदेशमधल्या देवासला स्थाईक झाले. गाणं बंद झालं आणि पर्यायाने आर्थिक उत्पन्न सुद्धा बंद झालं. घर चालवण्यासाठी भानुमतीने एका शाळेत प्राथमिक शिक्षिकेची नोकरी पत्करली. किती अवघड परिस्थिती असेल, विचार सुद्धा करवत नाही. गायचं नाही, अंथरुणावर पडून राहायचं, अशक्तपणा आलेला, न थांबणारा खोकला, घराबाहेर पडायची बंदी... गंधर्वाचं गाणंच बंद!! आजारपणात साध्या माणसाला सुद्धा नैराश्य येतं तर कुमारपणीच गंधर्वपद प्राप्त झालेल्या या महान गायकाला इतका जीवघेणा आजार झाल्यावर त्यांना सुद्धा नैराश्य येणं साहजिकच आहे. या काळातल्या पुण्याच्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, “भानूची ओढाताण होतेय सगळं सांभाळताना. एक दिवस माझी अवस्था पाहून असस्थ झालेली भानू उन्मळून रडायलाच लागली. तिला सहनच झालं नाही. मी तिला म्हटलं, भानू, तू रडू नको, गायल्याशिवाय मी मरणार नाही” हा दुर्दम्य आत्मविश्वास पाहिला की थक्क व्हायला होतं!!
     त्याही अवस्थेत त्यांनी गाण्याचा विचार सोडला नाही. पडल्या पडल्या ते अनेक रागांचं मनन चिंतन करत असत, काही स्फुरलं तर लिहून ठेवत असत. या काळात त्यांनी अनेक बंदिशी लिहिल्या. अतिशय महत्वाचं म्हणजे देवास जवळ असणाऱ्या माळवा प्रांतातल्या विपुल अश्या लोकसंगीताचा अभ्यास केला. भानुमती लोकगीतं म्हणणाऱ्या लोकांना घरी घेऊन यायची, कुमार ते ऐकायचे आणि त्याचं नोटेशन करून ठेवायचे, अभ्यास करायचे. थोडं बरं वाटायला लागल्यावर ते स्वतःच सगळीकडे हिंडून या लोकधूना गोळा करायचे... याच लोकधुनांतून त्यांनी ९ धूनउगम राग निर्माण केले. त्याचं सांगणं होतं की सगळं संगीतच मुळी या लोकधुनांतून उत्क्रमित झालं आहे. आधी लोकधुन, लोकसंगीत मग शास्त्रीय संगीत. राग संगीत आणि भावसंगीत हे काही वेगळे नाहीत. सूर, ताल, लय सगळं असूनही ज्यात भावना नाहीत ते संगीतच नाही!!
     अखेर दुसरं महायुद्ध संपता संपता streptomycine या प्रतिजैविकाचा शोध लागला आणि TB वर औषध उपलब्ध झालं. त्याने कुमार बरे झाले. जवळ जवळ ५ वर्षानंतर त्यांना पुन्हा गाण्याची परवानगी मिळाली. तेव्हा त्यांनी मुंबईमध्ये जे गाणं सदर केलं, ते ऐकून लोक अचंबितच झाले. इतकं तरल, मनाचा ठाव घेणारं आणि तरी सुद्धा कोणत्याच घराण्याच्या चौकटीत न बसणारं असं गाणं होतं ते!
     मुंबईचा कार्यक्रम झाल्यावर ते पुण्याला येणं साहजिकच होतं, पु.ल. देशपांडे, वसंतराव देशपांडे, अशी जिवाभावाची मित्रमंडळी त्यांची वाट पाहत होती. पु.लंनी एक आठवण सांगितली आहे, सबकुछ पु.ल. असलेला गुळाचा गणपती या सिनेमाचं शुटींग आळंदीच्या जवळ कुठेतरी चाललं होतं. तेवढ्यात कुणीतरी निरोप घेऊन आलं, “भाई, कुमार आला आहे आणि तो गाणार आहे” त्याबरोबर पु. ल. आळंदीच्या अबीर बुक्क्यासाहित पुण्याला आले आणि कुमार काय गायले?
मंगल दिन आज बना घर आयो,                                                                                
आनंद मन भराय बावरी भई मैंतो....
निखळ आनंद देणारा हा मालवती...खरचच तो दिवस मंगल, आनंदी होता... तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचे कान तृप्त झाले. आज काहीतरी छान ऐकल्याचं समाधान मिळालं. त्याहीपेक्षा आनंदाची गोष्ट ही होती की कुमार बरे झाले होते, ते आता गाऊ शकणार होते..एक अरण्यपर्व संपलं होतं.
     या आजारपणामुळे त्याचं एक फुप्फुस बंद करून ठेवावं लागलं होतं, त्यामुळे ते एकच फुप्फुस भरून श्वास घेऊ शकत होते आणि गाताना तर दमसास टिकवणे फार गरजेचे असते. मग तरी ते कसे काय गाऊ शकत होते...एकदा त्यांनीच खुलासा केला... “एक लक्षात घे, चिमणीचं फुप्फुस केवढंसं, पण हैराण करते की नाही? अरे, हैराण करायला मोठे फुप्फुस लागत नाही. तसे विचार केले पाहिजेत हैराण करायला.” म्हणूनच गाणं त्यांच्या विचारातच होतं...मनात सतत वास करून होतं.
     हेच गाणं परत बहरत असताना एक अतिशय दुखद घटना घडली, त्यांचा जीव असणारी आणि अनंत कष्ट करून त्यांना आजारपणातून अक्षरशः बाहेर काढणारी त्यांची भानू हे जग सोडून गेली.  आता कुठे जीवनाला बहार आली होती तोच पुन्हा पूर्ण अंधार. भानूचे अंत्यविधी करू येत असताना त्यांना एक गच्च मोहोर आलेलं आंब्याचं झाड दिसलं, तिला आंबे फार आवडायचे. त्याच क्षणी त्यांना एक बंदिश सुचली..
फेर आयी मोरा अंबुवा पे.... आंब्याला फिरून परत बहर आलेला आहे...  तशी तू फिरून परत येशील का? हेच तर विचारायचं नसेल त्यांना? त्यातली व्याकुळता सही सही त्या बागेश्री मध्ये उतरली आहे. त्यांनी दैनंदिन जीवनात घडलेल्या अनेक घटनांवरून बंदिशी केल्या आहेत हे पाहून खूप कौतुक वाटतं.
     त्यांना निसर्गाबद्दल मोठी ओढ होती. ते विचारतात, तुम्ही पहाटे उठता तेव्हा तुम्हाला रात्री झोपताना जसं वाटत असतं तसंच वाटतं का? उन्हाळ्यातली सकाळ आणि हिवाळ्यातली सकाळ सारखीच असते का? नाही ना? म्हणून प्रत्येक राग गाण्याची वेळ वेगळी. त्यातल्याही प्रत्येक बंदिशीचा भाव वेगळा. सकाळी फुलं जशी दिसतात तशीच ती संध्याकाळी सुद्धा दिसतात का? नाही.. म्हणूनच दुर्गा रागातल्या ‘आनंद झारायोरी’ची रात्र कोणतीही असून चालत नाही; ती शरद पौर्णिमेचीच रात्र असावी लागते, आणि पुरियाधनाश्री मधल्या ‘आजारा दिन डूबा’ मधला सूर्यास्त हा ग्रीष्मातलाच असावा लागतो. ह्या बंदिशी आपल्याला अपोआपच जाणीवेतून नेणीवेत घेऊन जातात. अतिशय तरलपणे विचार केल्यावरच हा दृष्टीकोन येऊ शकतो. 
कुमारांनी गाणं फक्त गायलंच नाही तर अनेक बंदिशींची रचना सुद्धा केली.
सिर पै धरी गंग, कमर मृगछाला 
मुंडकी गलमाल, हथेली सुल साजे | 
पिनाकी महाग्यानी, अजब रूप धारे 
डुलत डुल आवे, डमरू डिम बाजे ||
शंकराचं इतकं सुंदर वर्णन इतक्या छान शब्दांत मी आजपर्यंत कुठे ऐकलं नव्हतं! साक्षात शंकर नाचत नाचत समोर उभा ठाकतो...
आणि

रंग ना डारो श्यामजी गोरी पे रे 
पेरी लई ये नयी सारी 
सखी सहेल्या हँस करे देंगी गारी | 
कैसे हो खिलारी, मानत नाहीं 
बरजोरी ना करो जावो मैं तो हारी |
    सोहनी या मध्यरात्री नंतर गायच्या रागामध्ये, एक तरुणी कृष्णाला माझ्यावर रंग टाकू नको असं सांगतेय... कृष्ण, गोपी आणि त्यांच्या रासलीला हा तर तमाम गीतकारांचा आवडीचा विषय. कृष्ण गोपिकांवर रंग टाकतो आणि त्या खेळता खेळता रंग नको टाकू; म्हणजेच टाक, असं सांगत असतात... पण इथे रंग ना डारो श्यामजी हे म्हणणारी युवती किती आर्त विनवणी करतीये. इथे तिला त्याचं रंग टाकणं एकाच क्षणासाठी आवडतंय, लुभावतंय पण सर्वांसमोर दाखवतही येत नाही, समाज लज्जेसाठी तिला त्याला आडवावंसं वाटतंय. त्याने रंग टाकल्यावर आतल्याआत तिला काहीतरी झालंय, ते फार मोहवणारं आहे. त्याच वेळी आपलं भान सुटता कामा नये ह्याची जाणीव होऊन तिला वेड लागायची पाळी आली आहे!!! कुमारांच्या या काव्य आणि स्वरांपुढे आपले शब्द थिटे पडतात...
     कुमारांचं आणखी एक सांगणं म्हणजे लय. प्रत्येक विचार, ख्याल हा स्वतःची एक स्वाभाविक लय घेऊन येतो. प्रत्येक भावनेच्या छटेला एक intensity असते. त्या intensity ची लय ओळखता आली पाहिजे. ते समजलं की ठराविक बंदिश त्याच विशिष्ट लयीत का बांधली असेल हे समजतं. मालवती मधलं चला रे, चला जा रे हे ऐकताना ते विलंबित एकतालात का बांधलं असेल हे उमगतं.
     त्यांच्या मनाचा साधेपणा म्हणजे त्यांनी जे काही निर्माण केलं, नवीन राग, बंदिशी ते सगळं सांगून टाकलं कुठेही लपवा छपवी नाही. गुरूने मुक्त हाताने दिलं पाहिजे. एका मैफिलीत त्यांनी सांगितलं, “आमच्या गुरुंनी सुद्धा ज्यांच्या कडून हे घेतलं, नोटा देऊन विद्या घेतलेली आहे. घेणं भाग होतं, कारण दान करायला तयार नव्हते. म्हणून त्यांच्याकडून विद्या कमी झालेली आहे, आमच्याकडून विद्या(देताना) कमी होणार नाही.” हे ऐकताना हेलावून जायला होतं. खरोखर त्यांनी ‘अनुपरागविलास’मध्ये सगळं काही ज्ञान देऊन टाकलेलं आहे.
     साधारणपणे गाण्याच्या मैफिलीची रचना भूपाळी ते भैरवी किंवा एखादा राग, बडा ख्याल, द्रुत छोटा ख्याल आणि नंतर एखादं उपशास्त्रीय गाणं अशी असते. कुमारांनी या मैफिलींमध्ये अभिनव प्रयोग केले. त्यांना इतकं सांगायचं होतं की सारखं तेच गायला त्यांच्याकडे वेळच नव्हता. त्यांनी गीत वर्षा, गीत वसंत, गीत हेमंत सारखे पूर्ण ऋतुचक्र डोळ्यांसमोर उभे करणारे कार्यक्रम केले. कबीराचे निर्गुणी भजनं तर आपल्याला अंतर्मुख करून जातात. शिवाय तुकाराम दर्शन, गोरखनाथ, मीरा, सूरदास जवळपास सगळ्याच संतकविंच्या रचना स्वरबद्ध करून गायल्या. ठुमरी टप्पा तराणा सारखा अगदी वेगळाच कार्यक्रम सदर केला, आज पर्यंत या तिन्ही गायन प्रकारात काही साम्य किवा काही संबंध आहे का हे शोधण्याचा कोणी असा प्रयत्न केला नसावा.
     राघव मेनन म्हणतात त्याप्रमाणे कुमार गंधर्व म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताच्या आकाशात चमकलेली उल्का आहे जिच्या अवकाशातून जाण्याने भारतीय संगीताचे कुमारपूर्वी आणि नंतर असे दोन ठळक भाग झालेले आहेत.
     शेवटी या सगळ्या गायकीतून मला एक जाणवलं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला एक प्रतिज्ञा केली आहे;
 तेणे कारणे मी बोलीन, बोली अरुपाचे रूप दावीन||
 अतींद्रिय परि भोगवीन इंद्रीयाकरवी||
    म्हणजे गाणं या माध्यमातून मी बोलीन, माझ्या बोलीतून अमुर्ताचेही रूप दाखवीन आणि जे सर्वसामान्य ज्ञानेन्द्रियाने भोगता येत नाही ते मी रसिकांना साध्या कानांनी भोगवीन...ही प्रतिज्ञा कुमारांनी पूर्ण केल्याचा प्रत्यय येतो...

 अमृता देशपांडे.
                                                                                                                  amrutadeshpande.1414@gmail.com

No comments:

Post a Comment

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...