Monday 12 August 2019

राधा कृष्ण




राधा कृष्ण
प्रत्येक स्त्रीच्या मनात एक कृष्ण असतो. सावळा, सुंदर, तिच्यावर ती जशी आहे तशी तिला स्वीकारून प्रेम करणारा. तिला त्याच्यात एकरूप होऊ देणारा, तिला तीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणारा, तिला समजून घेणारा..
त्याला खरंतर अनेक भूमिकांमधून जावं लागतं..हजार बायकांचं नवरेपण, अर्जुनासारख्या बलदंड योध्याचं दिशादर्शन , नेतृत्व आणि राधेसोबत हळवं नातं..!
राधेलासुद्धा हाच कृष्ण आवडतो. एकाच वेळी अनेक गोष्टी पार पाडणारा आणि तरीसुद्धा तिच्यासोबत प्रणय करणारा. तिला खुलवणारा... भुलवणारा.
आजवर कविता आणि गाण्यातून कृष्णाची असंख्य रूपं समोर आलेली आहेत.
त्यात...
ढग दाटून आलेत, वारा वाहतोय ; मला माझ्या कृष्णाला लवकर भेटव..त्याच्याशिवाय मला चंद्र-चांदणे, चाफ्याची फुले काहीही रिझवत नाही; फक्त तो पाहिजे. तिथे चंदनाची चोळी केली काय आणि फुलांची गादी केली काय...त्याच्या सहवासाशिवाय सगळंच बेचव...!
घनू वाजे घुणघुणा, वारे वाहे रूणझुणा
भवतारकू हा कान्हा , वेगी भेटवा का
चांदू वो चांदणे, चापे वो चंदने
देवकीनंदनेवीण, नावडे वो.

प्रत्यक्ष ज्ञानेश्वर हे लिहितात!!
तिला जितक्या अधीरतेने त्याला भेटायचं आहे , तितक्याच अधीरतेने तोही तिला भेटतो. कितीही काम असलं तरीही तो त्यावेळी तिला फक्त न फक्त तिचाच वाटतो. हा त्याचा समंजसपणानं तिचे लाड करतो. तिनं केलेल्या चमत्कारिक खोडया त्याला आवडतात...

पितांबरची साडी ल्याली
मोरपिसाची करीता चोळी
वेळीअवेळी काजळ काळी
उटी लाविते मुखचंद्रला
वेड लागले राधेला.....

आणि असे नखरे करतानाच, यमुनेमध्ये डुंबतानाच तिची ..
डुंबत अविरत यमुना डोही
राधेची ती कृष्णा होई
  कृष्णावर प्रेम करिता-करीता ती स्वतःच राधा होऊन जाते.
शेवटी राधा म्हणजे तरी कोण..? ती स्वतःच सांगते ...
मी राधिका, मी प्रेमिका
तन शाम, मन श्याम
प्राण सखा घनश्याम
  ज्या गोष्टी ती इतर कुणाला , अगदी स्वतःला सुद्धा सांगू शकत नाही ते त्याला सांगता येत किंवा न सांगताही तिच्या मनात काय चाललंय याच प्रतिबिंब त्याच्या मनात तयार होतं. त्यांना बोलायला शब्दांची गरजच वाटत नाही. नुसत्या एकमेकांच्या नजरेतून , भावनांतून ते एकमेकांशी मुक्तपणे बोलतच असतात. गर्दीत असूनही मुक्तपणे एकमेकांशी संवाद साधत असतात.
कृष्णाची जरी अनेक विश्व असली तरी कृष्ण आणि कृष्णच राधेचं विश्व होतं. त्यामुळे त्याच्यासाठी संसारात असतानासुद्धा आपल्या सर्व भावना बाजूला ठेऊन
रात्रंदिवस त्याच्यात विलीन होणारी राधा...
कृष्ण सावळा गोरी राधा, कृष्णसख्याची जडली बाधा,
कृष्णच नेत्री, कृष्णचं गात्री, कृष्णात राधिका विरघळली ,
लाजेची ती वसने फिटली, लोकांमधून राधा उठली ,
राधा-मोहन होता मिलन, हरीकांती तनुवर पांघरली.
मला कधी कधी गमतीशीर प्रश्न पडतो, जर राधा आणि कृष्ण एकमेकांना आज, आजच्या युगात भेटले असते तर काय म्हणाले असते?
राधा म्हणाली असती-
आपली ओळख नसताना तू माझा मित्र झालास
तू माझा कृष्ण झालास मी सुदामा...
ओळख झाल्यावर मला दिशा देणारा दिवा झालास
तू माझा कृष्ण झालास मी अर्जुन....
एका क्षणी वाटून गेलेलं स्वप्न
तू माझा कृष्ण व्हावंसं मी रुक्मिणी...

पण आपण तर जन्मलोय एकमेकांचे असण्यासाठी...
तू माझा कृष्ण आहेस आणि मी तुझी राधा...
त्या युगापासून या युगापर्यंत,
तू माझा कृष्ण, मी तुझी राधा..

आणि कृष्ण म्हणाला असता-

प्रत्येकाचा कृष्ण वेगळा
गोकुळात रुसणाऱ्या पेंद्याला चिडवणारा
मैत्रीत सुदाम्याला सर्वस्व देऊ करणारा
कांसासाठी काळ तर गोकुळासाठी काळसर्पाला भिडणारा
प्रत्येकाचा कृष्ण वेगळा
द्यूत टळावं म्हणून प्रयत्न करणारा
द्रौपदीच्या अंगाभोवती वस्त्र लपेटणारा
युद्ध टळावं म्हणून कृष्णनीती
तर टळत नाहीच समजल्यावर
स्वतःला आणि स्वतःच्या सैन्याला दोन्ही भावांमध्ये वाटणारा
गलितगात्र अर्जुनाला गीता समजवणारा
वारंवार प्रजेवर होणारे हल्ले टाळण्यासाठी राजधानीच बदलणारा
रुक्मिणी आणि सुभद्रा यांच्यामध्ये पारिजातक उभा करणारा
आणि
व्यधाच्या बणाने अवतार कार्य संपवणारा
प्रत्येकाचा कृष्ण वेगळा
आणि राधेचा?
तो सर्वव्यापक प्रेममय होऊन तिच्यातच विरघळणारा--
स्वतःचं नाव तिच्या मागे लावणारा
राधा तर कृष्णच होती---
त्यामुळं तिचा कृष्ण वेगळा नव्हताच,
म्हणून तर व्यासांनी तिला त्या तसल्या द्वेषपूर्ण महाभारता बाहेर गोकुळातच ठेवलं--
तरी पण तिचा कृष्ण वेगळा, तिच्या पुरता, तिचा तिच्यासाठी--
राधे, फक्त तुझा कृष्ण!!
त्यामुळे कृष्ण हा देव आहे, दैवत आहे की माणूस आहे हा वाद न घालता, माझ्या मते तरी प्रत्येकीच्या मनात एक कृष्ण सतत वास करून आहे. त्यामुळेच तर ती राधाही जिवंत आहे..!
इतकं असूनसुद्धा एक प्रश्न माझ्या मनात हळूच डोकावतो तो म्हणजे जस प्रत्येक स्त्री च्या मनात कृष्ण असतो तसंच प्रत्येक पुरुषाच्या मनात एक तरी राधा असते का..????
©अमृता चिकटे-देशपांडे


1 comment:

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...