Sunday 11 August 2019

पोवाडा


पोवाडा

पोवाडा हा हजारो वर्षे जुना लोककलेचा प्रकार असूनही आजही मराठी लोकमानसावर या पोवाड्याची विलक्षण मोहिनी आहे. मराठीमनाला टाळ मृदुंगाइतकेच डफा-तुनतुण्याचे वेड आहे. डफावर शाहिराची थाप पडताच मराठी छाती अभिमानानं फुलून येते.

पोवाडा हा शब्द जरी नुसता उच्चारला तरी मराठी माणसाच्या अंगात वीरश्री संचारते. पोवाडा म्हणजे समरप्रसंगाचा आणि वीरश्रीपूर्ण दुर्दम्य जीवनोत्साहाचा अविष्कारच!! 
पोवाडा या शब्दाचे दोन अर्थ सांगितले जातात पहिला म्हणजे संस्कृतमध्ये 'वद' नावाच्या धातूला 'प्र' हा उपसर्ग लावून 'प्रवद' म्हणजेच मोठ्याने बोलणे असा अर्थ होतो, मोठ्याने म्हणजे इथे याचा अर्थ  वरच्या स्वरात गाणे म्हणणे असा आहे.  या प्रवद शब्दाची ...होत होत मग  पवद , पवड ,पवाडा आणि पोवाडा असे ..झाले.
आणि दुसरा अर्थ असा, की मूळ पवाड हाच शब्द असून याचा अर्थ गोष्ट सांगणं असा आहे. दोन्ही अर्थ लागतात. पोवाड्यात कोणत्यातरी युद्धच्या प्रसंगाचं स्फुर्तीदायक वर्णनच केलेलं असतं. त्यामुळे दोन्ही अर्थ योग्यच आहेत..
पोवाडा ही लोककला आहे. लोकगीत आणि पोवाड्यामध्ये काही साम्यं आहेत पण मूलभूत फरक जास्त आहेत. लोकगीतं कोणत्याही सण-समारंभाच्या वेळी जेव्हा एखादया समाजातले अनेक लोक एकत्र येतात त्या वेळी समुदायाने म्हटली जातात. याला लय, ताल आणि चाल असते. लोकगीतांना अनेकदा नृत्याची अपेक्षा असते. लोकगीतांना सण, नातं, मुलीचं माहेरपण, सासुरवास, प्रेम, विरह किंवा मृत्यू असे अनेक विषय असू शकतात. लोकगीतांमध्ये कथा असेलच असं काही नाही. पोवाडे मात्र विररसपूर्ण असतात आणि त्यांचे विषय साधारणतः शौर्याच्या लढाईच्या कथा हेच असतात. यामध्ये कोणत्यातरी घटनेचं, समरप्रसंगाचं किंवा धाडसाच्या कृतीचं गोष्टरूपी वर्णन असतं. हे पोवाडे गाऊन म्हणतात. पोवाडे रचणाऱ्यांना आणि गणाऱ्यांना शाहीर म्हणतात. 


शाहीर हे नाव उर्दू परंपरेतून आलं आहे. शाहीर हा शब्द साहर किंवा साहीर या शब्दापासून आला आहे. त्याही आधी पोवाडे गाणाऱ्याला आपल्याकडे 'गाण' हा शब्द होता.

पोवाड्यांचा उगम पाहायला गेलं तर अगदी अथर्ववेद काळापर्यंत मागे जातो. त्या काळातला परीक्षित राजानं रचलेल्या अथर्ववेदमध्ये परीक्षित गाथांचा उल्लेख आहे. त्यामुळे परीक्षित राजा हा भारतीय पोवाड्यांचा परंपरेतला पहिला ज्ञात शाहीर म्हणता येईल. यामध्ये नराशंसी किंवा नरप्रधान गाथा म्हणजेच ठराविक महापुरुषांच्या आयुष्यातल्या ठळक प्रसंगांवर किंवा त्यांच्या दनशूरतेवर रचलेले पोवाडेच होते.

आपल्याकडे पुर्वापार अशी परंपरा होती की लढाई जिंकल्यावर राजे मानाचा दरबार भरवायचे. ज्यांनी शौर्य गाजविलं असेल त्यांचा सन्मान करायचे. त्याना उच्च हुद्दा म्हणजे आजच्या भाषेत प्रमोशन ध्यायचे. लढाईत मृत झालेल्यांच्या मुलांना सैन्यात दाखल करून घ्यायचे. मुलं अल्पवयीन असल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी म्हणजे आजच्या भाषेत अनुकंपा तत्वावर नोकरी देणे आणि आजच्या भाषेत पेन्शन प्रमाणे वार्षिक मानधन ध्यायचे. ह्या सगळ्या कल्याणकारी योजना शिवाजी महाराजांनी अंमलात आणून खरी क्रांती घडविली.

असा जो सन्मान दरबार भरायचा त्यावेळी राजांच्या पदरी असलेले कवी शाहीर कवने पोवाडे सादर करायचे. पोवाडा ही विररसानी भरलेली कवीताच. पण सादरीकरण असं की ऐकणाऱ्याच्या अंगातही विरश्री संचारावी.  प्रसंगाचे वर्णन ऐकताना अंगावर सरसरून काटा यावा, अंग शहारून जावं किंवा दरदरून घामही फुटावा इतकी ताकद शाहीराच्या पोवाड्यात असते. आपण अनेक पोवाड्यातून हा अनुभव घेतला असेल.
त्या काळी संवादाची साधनं आजच्या सारखी प्रगत नव्हती. त्यामुळे एखाद्या लढाईत किंवा विशेष प्रसंगी नेमकं काय घडलं याची बातमी सर्वसामान्य जनतेपासून दूरच असायची. तेव्हा अशी माहिती देणाऱ्या देणाऱ्या पोवाड्यांना खूपच महत्व होतं. आणि पोवाडे सुद्धा घडलेल्या गोष्टीची इथ्यंभूत माहिती असे. कारण पोवाडे रचणारा शाहीर कित्येकदा घटनास्थळी प्रत्यक्ष हजर असे. असा प्रत्यक्षदर्शी माणसानं रचलेला पोवाडा हा पहिल्या प्रतीच्या पोवाड्यामध्ये गणला जातो आणि दुसऱ्या कोणीतरी प्रत्यक्ष पाहिलेल्या घटनेचं वर्णन शाहिराला करून दाखवलं आणि त्यावरून त्यानं पोवाडा रचलेला असेल तर त्याला दुसऱ्या प्रतीचा पोवाडा असं म्हणतात.
पोवाड्याच्या कडव्याला चौक म्हणतात. पोवाडा गाताना किंवा शाहीर सलग गात नाहीत. ते मधेच थांबून पुढे कथानक सांगतात. नंतर परत पुढचे चौक म्हणतात. प्रत्येक चौकाची चाल वेगळी असते. लय वेगळी असते. पोवडा गाताना अत्युच्च पराक्रमाच्या वेळी गाण्याची ली वाढते आणि नंतर शेवटी ती पुन्हा कमी होते. पोवाडा संपल्यावर शाहीराला सोन्याचे कडे बक्षिस मिळत असे.

जिजाऊ साहेबांनी अज्ञानदासाचा अफझलखानच्या वधाचा पोवाडा ऐकल्यावर असे कडे बक्षिस दिल्याची माहिती मिळते.

 पोवाडा फक्त महाराष्ट्रात म्हटला जातो असं नाही. इतरही प्रांतात पोवाड्यासारखे गीत प्रकार आहेत. राजपुताणन्यात राजघराण्यातील अनेक प्रसंग हे पोवाड्यात गुंफलेले आहेत. त्यातलाच पिंगलेची कथा प्रसिद्ध आहे. त्याच प्रमाणे बंगाली गीतिकथा, छत्तीसगड चे ढोल किंवा धोल या नावाने प्रसिद्ध असलेले पोवाडे, कच्छ मधले भाट आणि दादी चे पोवाडे प्रसिद्ध आहेत. सिंध आणि काश्मीर प्रांतातसुद्धा पोवाडे प्रसिद्ध आहेत. फक्त त्या त्या राज्यांमध्ये पोवाडा या शब्दाला दुसरा कोणतातरी पर्यायी शब्द आहे पण त्या सगळ्या रचना पोवाडा याच गितप्रकारात मोडतात हे नक्की.
युरोप आणि इंग्लंडमध्ये पोवाडा सदृश गीतं असली तरी सगळ्याच लोकगीत प्रकारांना 'बलाड' म्हणतात त्यामुळे तिथे  सगळ्यांना एकच नाव आहे.


2 comments:

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...