Saturday 10 August 2019

वेदना


वेदना
देवा मला रोज एक अपघात कर।
आणि तिच्या हातानी जखमा या भर।।
देवा मला रोज एक अपघात कर...।
संदीप खरेचं हे गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हा हसावं की रडावं तेच कळेना. अपघात, जखमा किंवा वेदना कुणी मागून घेतं का
आपणही अनेक वेळा वेदनेचा अनुभव घेतो पण बहुतांश वेळा तो नकोसाच असतो. अगदी लहानपणी मुलं खेळताना पडतात गुडघे फुटतात, खरचटतं, रक्त येतं.. अश्यावेळी जितकं लागलंय त्यापेक्षा कितीतरी पट मोठं भोकाड पसरून रडणारी मुलं तेव्हा खरंच गोड दिसतात. थोडी सहानुभूती दाखवली की त्याना बरं वाटतं. मग ती जखम बरी होत आली की अभिमानानं सगळ्यांना दाखवण्यात त्यांना कोण आनंद होतो..
माणसाला खरंतर अनादी काळापासून या वेदनेबद्दल माहिती असणार. तरीही थोडं काही दुखलं की आपण लगेच धास्तावतो. ही भीती त्या वेदनेमुळे होणाऱ्या दुखण्याची नसते तर त्या नन्तर हे दुखणं सहन होण्यापलीकडे वाढलं तर होणाऱ्या अनाकलनीय परिणामांची असते.
साध्या भाषेत सांगायचं तर वेदना म्हणजे शरीराच्या कोणत्याही भागाला इजा झाली असेल किंवा काहीतरी बिघाड झाला असेल तर तिथे असणारे मज्जातंतू मेंदूला जी सूचना देतात ती म्हणजे वेदना! वैद्यकीय क्षेत्रात ही वेदना कुठे आणि कशी होतेय यावर अनेक रोगांचं निदान अवलंबून असतं.
पण ही वेदना नेहमीच वाईट असते असं नाही. वेदना अनेकदा चांगलीसुद्धा असते. मी तर म्हणेन वेदनेसारखा मार्गदर्शक मित्र नाही! एखादया रस्त्यावरून चालताना रस्ता खडबडीत आहे हे आपल्याला पायांना जाणवतं. तोच रस्ता अजूनच टोकदार दगडांचा असेल तर? एखादी वस्तू उबदार आहे हे आपल्याला कळतं पण तीच वस्तू अजून तापली तर?
तर दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला इजा होईल आणि दुखेल! हीच तर मजा आहे; जेव्हा जेव्हा एखादी जाणिव सहनशक्तीच्या पलीकडे जाते तेव्हा तिची वेदना होते!! याच जाणिवेमुळे आपण आपल्या शरीराला संभाव्य धोक्यांपासून वाचवत असतो.
खरंतर माणसाचं शरीर इतकं नाजूक आहे की एखादा टोमॅटो कापतो तितकाच जोर लावून सूरी जर माणसाच्या अंगावरून फिरवली तर माणसाची त्वचा सुद्धा टोमॅटोसारखी कापली जाते! पण हे होण्याआधीच आपल्या वेदना होतात, कापल्यामुळे आधी कधीतरी झालेल्या वेदनांची आठवण होते आणि आपण त्यापासून स्वतःचं संरक्षण करतो.
हीच जाणीव किंवा आपल्या त्वचेची आणि शरीराच्या आतल्या अवयवांची संवेदनशीलता माणसाचं कायम संरक्षण करत असते.
याच जाणीवा जेव्हा कृत्रिमरीत्या क्षीण केल्या जातात तेव्हा तो अनेस्थेशीया होतो!! वैद्यकीय शोधांमध्ये हा अतिशय महत्वाचा शोध आहे.
या वेदना कधीकधी हव्याहव्याशा पण असतात. खूप दमल्यावर कोणीतरी पाय चेपून दिले की किती बरं वाटतं? एकाच जागेवर बसून कंटाळा आला असेल तर बाहेर थोडं पळून आलं, थोडे पाय दुखायला लागले की बरं वाटतं.
आणि महिन्याच्या महिन्याला येणारी पाळी जेव्हा पाठीत किंवा मांड्या थोड्या दुखून आपल्या येणाची पूर्वसूचना देते तेव्हा ते आरोग्याचंच लक्षण असतं!
अर्थात हा त्रास जास्त होत असेल दर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. अति वेदनासुद्धा सहन करू नये.
आणि सर्वात हवीहवीशी आणि आपण वाट पाहत असलेली वेदना म्हणजे 9 महिने पोटात गर्भ वाढवल्यानन्तर पाठीत किंवा पोटात मंद मंद कळा सुरू होण्याची वेळ!!
या वेदनांमुळेच माणसाला काहीही दुखणं खुपणं नसतानाचं आरोग्याचं महत्व पटतं. काही जीर्ण आजारांमध्ये इतक्या जीवघेण्या वेदना होतात की या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी माणूस आत्महत्येचा टोकाचा विचार करायला प्रवृत्त होतो. या वेदनाच मग त्याच्या आयुष्यभर सवयीच्या होऊन जातात. 
वेदनाच नसत्या तर कदाचित माणसाला अंतिम मृत्यूचं सुद्धा भय वाटलं नसतं! मग तो कदाचित सगळीकडे बेडरपणे संहार करत सुटला असता!
माझ्यामते या सगळ्या शारीरिक वेदनांपेक्षा मानसिक वेदना महत्वाची असते. शारीरिक वेदना माणसाला आपोआप जाणवते. मानसिक सहवेदना माणसाला समजावून घ्यावी लागते. समोरच्या माणसाला काय त्रास आहे, जगात किती दुःख आहे हे फक्त डोळ्यांनी पाहून आणि कानांनी ऐकून समजत नाही. त्यासाठी मनच संवेदनशील असावं लागतं. आणि हेच प्रगल्भपणाचं पाहिलं लक्षण असावं!!
तर अशी वेदना माणसाला सतत दिसत राहायला हवी. दुसऱ्यांची दुःखे कमी करता यायला हवीत. कदाचित याच अर्थानं तुकारामांनी म्हटलं असावं..
वेदनेचा मज लागलासे लळा।
तो आनंदसोहोळा काय वर्णू?
अमृता देशपांडे


2 comments:

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...