Wednesday 31 July 2019

सध्या माझं काय चालू आहे??

सध्या आतल्या आत काहीतरी चाललंय, ते नीटसं कळतही नाही आणि सांगताही येत नाही. कदाचित आपल्या आतला शोध चालू आहे. सगळ्याच दिशांनी विचार चालू आहेत. वरवर पाहता, गाणं , वाचन चालू असलं तरी आत काहीतरी वेगळंच चालू आहे. त्याला कोणता भाव नाही, कोणतं रूप नाही ते इतकं अस्फुट आहे की शब्दात नेमकं सांगताही येत नाही.  एक मात्र कळतंय की या काहीतरी प्रसवण्या पूर्वीच्या वेणा असू शकतील.. ठीक आहे, काही नाही प्रसावलं तर षंढवेणा ठरतील..पाहू या काय होतंय...

कागद पुढे ओढवा आणि फरा फरा काही लिहावं असं सुचत नाही,
 पण डोळे तुडुंब भरलेल्या ढगासारखे कायम वर्षावाच्या पवित्र्यात...

हे कोणतं दुःख आहे जे माझ्याशी सलगी करू पाहतंय? 

ही कोणती भावना आहे जी रुसलेल्या लहान मुलीसारखी, कळते पण शब्दाचा आकार घ्यायला तयार होत नाही?

एकीकडे खूप खूप खोल बुडत चालल्याची जाणीव होतेय तर दुसरीकडे विजिगीशू वृत्ती निर्मितीचे धागे सोडून द्यायला तयार होत नाही?

एक सीमा ओलांडल्याशिवाय दुसऱ्या देशात प्रवेश नाही हे कळून सुद्धा मधल्या अवकाशात भरकटण्याची भीती का वाटावी?

शिशिर (अमृता देशपांडे)

No comments:

Post a Comment

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...