Wednesday 31 July 2019

बाहुली

ए मिने,
आहेस का घरात?
येऊ का आत?
तू काय अन मी काय आता बिझी झालो,
एकमेकींच्या घरी यायची तरी परवानगी घ्यावी लागते..

पूर्वी कसं, घरातून पळत निघालं की एक उंबरा ओलांडून धाडकन तुझ्या घरात पोहोचल्यावरच फतकल मांडून बसायचं..
तेव्हा नाही लागायची कुणाची परवानगी..

तेव्हा आपणच काय आपल्या बाहुल्या पण एकमेकिंकडे मुक्कामाला असायच्या..

त्याही आपल्यासारख्या भांडायच्या, आपणही भांडायचो..
पुन्हा पाच मिनिटांनी घर घर खेळायचो..

चूल बोळकी मांडायचो, भाजी भाकरी रंधायचो,
असलं काही कमी जास्त तर भागवा भागवीही करायचो

बाहुल्यांसाठी खाऊ करायचो, त्यांना शाळेत सोडायचो
आणि दमून तिथेच उंबऱ्यात झोपूनही जायचो..

बाहुल्या मोठया झाल्या, आपण त्यांची लग्नही लावून दिली
आपणही मोठ्या झालो, आपलीही लग्नं झाली..

आणि कळतंय का तुला मिने,
कळत न कळत आपणच बाहुल्या झालो..

शिशिर...

No comments:

Post a Comment

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...