Thursday 1 August 2019

आपलं काही हरवलंय का?

आपलं काही हरवलंय का? आपण कायम काही शोधत असतो का? माणूस जन्मापासून शेवटपर्यंत काय कमावण्याचा प्रयत्न करत असतो?

खरं तर माणूस प्रत्येक लहान मोठया शोधात स्वतःलाच शोधत असतो..कधी त्याला तो बसरीमध्ये सापडतो तर कधी लिखाणात, कधी देश हाच देव मानून समाजासेवेत त्याला स्वत्व सापडतं तर कधी क्रिकेटच्या बॅटमध्ये त्याला स्वतःचंच प्रतिबिंब दिसतं... हे नेमकं काय आहे? जो ज्या गोष्टीचा शोध घेत असतो त्या प्रत्येकालाच जे हवंय ते मिळतं का?

जो जे वांछिल तो ते लाहो...हे ज्ञानेश्वरांनी का लिहिलं असेल? मुळात माणूस हा काहीतरी मिळवण्याच्या, शोधाच्या मागे असतो आणि हे मिळवणं हा त्याचा आयुष्यभराचा प्रवास असतो. ज्याला जे हवं ते मिळतं तो समाधानानं डोळे मिटतो.

आशा नाम मनुष्याणाम् कश्चिद आश्चर्य शृंखला।
यया बद्धा प्रधावन्ति, मुक्ता तिष्ठति पंगूवत्।।

म्हणजे आशा ही माणसाच्या जीवनातली अशी काही चमत्कारिक साखळी आहे की तिच्यामुळे जो बांधला गेलाय तो काशाच्यातरी मागे वेड्यासारखा धावतो आणि जो मोकळा आहे तो पंगळ्यासारखा काहीही न करता हात पाय गाळून बसून राहतो...किती विरोधाभास पण किती मार्मिक सत्य सांगितलंय नं या सुभाषितात?

त्यामुळे जोपर्यंत माणसाला काशाची तरी आस, कशाचा तरी ध्यास आहे तोपर्यंत तो माणूस प्रयत्न करत राहणार, शोधत राहणार, धडपडत राहणार..तो शांत बसूच शकत नाही..
पण माणसाला कशाचा ध्यास असावा?

सतत काहीतरी नवीन शिकायचा ध्यास हवा, नवं काही ऐकायचा ध्यास हवा, सर्वांग सुंदर कला निर्माण करायचा ध्यास हवा, नवी भूमी पादाक्रांत करायचा ध्यास हवा, कोणा भुकेल्या जिवाच्या मुखात घास घालायचा ध्यास हवा...अशी ध्यास असलेली माणसं खऱ्या अर्थानं जिवंत असतात नाहीतर ...

आदमी
मरने के बाद
कुछ नही सोचता ।


आदमी
मरने के बाद
कुछ नही बोलता ।

कुछ नही सोचने
और
कुछ नही बोलने पर

आदमी
मर जाता है ।।
                      - उदय प्रकाश..
जास्त काय बोलावे??
- अमृता देशपांडे

No comments:

Post a Comment

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...