Friday 2 August 2019

वर्तमानाच्या आधीचा भूतकाळ

...वर्तमानाच्या आधीचा भूतकाळ

385 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर पहिला जीव अवतरला. तो जीव एकपेशीय होता. त्यांनतर सजीवांची उत्क्रांती होत होत अनेकपेशीय जीव आले, पाण्यातले हे जीव नन्तर उभयचर झाले. त्यांनतर जमिनीवर आणि आकाशातही सजीव सर्वत्र संचार करायला लागले. त्यातच 100 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर  सजीवांच्या एकाच जातींमध्ये प्रजननाची बहुलिंगी पद्धत निर्माण झाली. सजीवांची एखादी जात टिकवण्यासाठी आणि काळानुसार उत्क्रांत होण्यासाठी ते खूप महत्त्वाचं होतं. प्राण्यांमध्ये ही बहुलिंगी पद्धत खूपच समजूतदार असते. कुणी कोणाच्या जोडीदाराला चोरून किंवा पळवून नेत नाही. पण जेव्हा ही गोष्ट माणसांमध्ये आली तेव्हा अनेक शतकांपासून या व्यवस्थेमध्ये प्रचंड स्थित्यंन्तरं होत गेली.
माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये बुद्धी आणि भावनांचा मूलभूत फरक आहे. पोट भरल्यानन्तरचं समाधान, मृत्यूचं भय आणि आपल्या पिलांबद्दल माया अश्या काही मूलभूत भावना सोडल्या तर प्राण्यांना जास्त भावना समजत नाहीत. स्वार्थ, हेवेदावे, स्वामित्व हक्क अश्या भावना त्यामध्ये नाहीत. माणसानं जेव्हा शेतीचा शोध लावला तेव्हा एकाच वेळी गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य निर्माण व्हायला लागलं. तेव्हा ते साठवण्यातून स्वामित्व हक्क निर्माण झाले.
या स्वामित्व हक्कातूनच माझी संपत्ती माझ्यनन्तर माझ्याच मुलाला मिळायला हवी अशी एक धारणा निर्माण झाली. पण मग माझा मुलगा ओळखणार कसा, हा प्रश्न त्या गटा गटात एकत्र राहणाऱ्या माणसाच्या मनात निर्माण झाला. आणि या बरोबर लग्न व्यवस्था निर्माण झाली. माझी बायको फक्त माझीच वारसं निर्माण करेल अशी व्यवस्था झाली.  त्यातूनच बायकोवर स्वामित्व हक्क दाखवणं सुरू झालं. यातूनच नवऱ्यानं दुसऱ्या बाईसोबत संधान सांधलं तर चालतं पण बायकोनं असं करता कामा नये. ही धारणा निर्माण झाली.
यातून अनेक भांडणं, युद्धं आणि लढाया झाल्या. पण माणसाची  दुसऱ्यावर हक्क गाजवण्याची तहान याने संपली नाही. ती अजूनच जोरात उसळली. हाच आज समाजात होत असलेल्या बलात्कारासारख्या गोष्टींचा पाया आहे.
खरतर कुणालाही कोणीही आवडू शकतं, यात काहीही वाईट नाही. निखळ मैत्री आणि प्रेम या गोष्टी खूप पवित्र असतात, पण जेव्हा कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा कोणत्याही पातळीवर मग ती मानसिक , शारीरिक, बौद्धिक किंवा आर्थिक वापर करायला पाहतो तेव्हाच या अधःपतनाला सुरुवात होते. मग जो त्यातल्या त्यात बलिष्ठ असतो तो बळजबरी करतो, सत्ता, संपत्ती हडप करायचा प्रयत्न करतो. स्त्रियांवर बलात्कार करायचा प्रयत्न करतो.
यातून जर दुखावल्या गेलेल्या व्यक्तीने त्याच्या विरुद्ध आवाज उठवला तर गहजबच होतो. जेव्हा ती गोष्ट तिच्या सहनशक्तीच्या बाहेर जाते तेव्हा ती आवाज उठवते. म्हणजे या आधी बरंच काही होऊन गेलेलं असतं. कारण असे बळजबरी किंवा बलात्कार करणारे बहुतांशी वेळा कुणी लांबचे नसतात तर आपण ज्यांचावर विश्वास ठेवून बिनधास्त राहतो तेच असतात. या विश्वासाला धोका पोहोचला की "मी टू" सारख्या चळवळी उभ्या राहतात.
© अमृता देशपांडे

No comments:

Post a Comment

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...