Saturday 3 August 2019

मायक्रोस्कोप

मायक्रोस्कोप::
बारावीत असताना एकदा जिवशास्त्राच्या बाईंनी एक स्लाईड वर्गात आणली होती आणि सोबत मायक्रोस्कोपही मागवून घेतला. आणि वर्गातल्या सगळ्या मुलांसमोर एक आव्हान ठेवलं. ही स्लाईड मानवी पेशीची आहे. ही स्लाईड नीट लावून दाखवायची आणि ती पेशी स्त्री ची आहे की पुरुषाची आहे ते ओळखण्याचं असं ते आव्हान होतं.
एक एक करून वर्गातल्या साठही मुलांनी प्रयत्न केला, त्यातल्या त्यात एका हुशार मुलाला ती स्लाईड नीट लावता आली. पण ती स्त्रीची आहे की पुरुषाची हे मात्र कुणालाच ओळखता आलं नाही, आणि ते कसं ओळखावं हे ही कुणाला कळेना.

मुळात एखादी स्लाईड लावायची म्हणजे ती स्लाईड ज्या प्लॅटफॉर्मवर ठेवणार आहोत तो प्लॅटफॉर्म स्वच्छ आणि धूलिकण विरहित असायला लागतो. नाहीतर आपल्या फोकस केलेल्या ऑब्जेक्ट ऐवजी एखादा बॅक्टेरिया किंवा एखादा धूलिकणच आपल्याला दिसतो.
त्यांनतर आपली स्लाईड बरोबर त्या लेन्सखाली यायला हवी. हे एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्यानं मायक्रोस्कोपमध्ये बघून करावं लागतं.
आता प्रकाशाचा स्रोत त्या ऑब्जेक्टच्या खालच्या काचेतून अब्जेक्टवर पडेल असा ऍडजस्ट करावा लागतो. आणि हे सोपं नसतं.
इतकं सगळं झालं की ऑब्जेक्टइव्ह आणि आयपीस म्हणजे त्या ऑब्जेक्टपाशी असलेलं भिंग आणि आपल्या डोळ्यापाशी असलेलं भिंग यांची फोकल लेंग्थ ऍडजस्ट करावी लागते, कारण ती कमी किंवा जास्त झाली तरी डोळ्यांना दिसणारी प्रतिमा अस्पष्ट होते.
आणि हे झाल्यानन्तर पेशीच्या कोणत्यातरी भागावर मायक्रोस्कोप फोकस होऊन तो भाग मोठा होऊन आपल्याला दिसायला लागतो की पुन्हा आपण जे पाहतोय तो पेशीतला नक्की कोणता भाग आहे हे कसं कळणार?
यावर उपाय म्हणजे ती स्लाईड हळूहळू सरकवत पेशीच्या सीमारेषेवर म्हणजे पेशीभित्तिकेजवळ आणायची आणि मग ती नन्तर केंद्राकजवळ आणून त्या पेशीतले सगळे अवयव पहायचे.
सगळे अवयव तपासल्यांनातरही प्रश्न पडतोच की ही पेशी स्त्रीची की पुरुषाची?
मग आमच्या बाईंनीच उकल केली की ही पेशी पुरुषाची होती कारण, केंद्रकामधले रंगद्रव्य म्हणजेच क्रोमोसोम्स जर नीट पाहिले तर सगळे इंग्रजी एक्स सारखे दिसतात, आणि एकच क्रोमोसोम एक्स चा एक पाय तुटल्यासारखा दिसतो, तो म्हणजे वाय... आणि याच क्रोमोसोमवरून ती पेशी पुरुषाची आहे हे समजतं...
त्या दिवशी वर्ग संपला; पण माणसाला हे अतिसूक्ष्म जग ज्या यंत्राने दाखवलं ते यंत्र कसं कसं तयार होत गेलं असेल? या मागे कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी परिश्रम घेतले असतील? या प्रश्नांनी बेचैन करून सोडलं...
(पूर्व प्रसिद्धी : महाराष्ट्र टाईम्स, औरंगाबाद आवृत्ती)
अमृता देशपांडे

No comments:

Post a Comment

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...