Sunday, 27 October 2019

सहा वार प्रकरण...साडी

आज दोन वर्षांपूर्वी लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी साडीचा पहिला लेख लिहिला होता. तो प्रसिद्ध झालेल्या पहिल्या काही लेखांपैकी होता. आणि आज साडी याच विषयावरचा सोळावा लेख प्रसिद्ध झाला.
या लेखांमध्ये भारतात तयार होणाऱ्या हातमागावरच्या सगळ्या नाही तरी काही महत्वाच्या साड्यांबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करतेय. 
आता वेगवेगळ्या प्रांतात साडी नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल लिहिणार आहे. बायोटेक शिकत असताना मला एका मैत्रिणीनं साडी नेसण्याचे 9-10 प्रकार शिकवले होते.
शाळेत असताना कुठल्यातरी दिवाळी अंकातल्या एका लेखात साड्यांच्या अनेक प्रकारांबद्दल वाचलं होतं. आणि हे सहा वार प्रकरण आपल्या हाताबाहेरचं आहे, असं म्हणून तिथेच सोडून दिलं होतं.
शेकडो प्रकारच्या साड्या आणि तितक्याच प्रकारच्या त्या नेसण्याच्या पद्धती.. हे सगळं गोंधळून टाकणारं असलं तरी यातली उत्सुकता कमी होत नव्हती.
भाषा, इतिहास, विज्ञान, तंत्रज्ञान हे सगळे विषय अभ्यासताना कपडे या विषयाकडे डोळेझाक होत होती हे मात्र मान्य केलंच पाहिजे.
पण मधून मधून साडीबद्दलचं आकर्षण डोकं वर काढत होतंच. हे एकसंध वस्त्र, तिचे असंख्य प्रकार, तिचा पोत, काठ, पदर..आईची, आजीची आठवण असलेली साडी..
त्यातून आपण भारतीय, महाराष्ट्रीय, त्यातून स्त्री..मग साडीबद्दल काही माहीत नको का?
आपणच बाजारातून विकत आणलेल्या, नेसलेल्या साडीचा प्रकार जेव्हा मला कळायचा नाही, सांगता यायचा नाही तेव्हा खरंच लाजल्यासारखं व्हायचं.
नन्तर गंमत म्हणून साडीबद्दल लिहिलेला लेख प्रभातमध्ये प्रसिद्ध झाला आणि याच विषयावर लेखमाला लिहायचं ठरलं तेव्हा मला नऊवारी आणि पैठणी सोडली तर पुढे लिहिण्यासारखं काही आहे असं वाटतच नव्हतं. पण मग विजिगीशु वृत्तीनं साड्यांच्या अनेक प्रकारांचाच अभ्यास करून मगच लिहायचं ठरवलं. तुकारामांचं अभ्यासोनी प्रकटावे हे वाचन आज्ञा मानली आणि मग मात्र साड्यांचे वेगवेगळे  प्रकार शोधले तेव्हा पुन्हा हा पाहू की तो पाहू असं झालं, मग निवडक हातमागावर तयार होणाऱ्या, जागतिक पातळीवर गाजलेल्या आणि ज्या साड्यांच्या निर्मितीमागे काही इतिहास आणि रंजक कथा आहेत अश्या साड्या निवडायच्या ठरवल्या त्या सुद्धा किमान आठ दहा झाल्या..
या साड्यांबद्दल माहिती मिळवताना, त्यांच्या मागच्या रंजक कथा शोधताना, वस्त्र या प्रकाराचा त्या त्या समाजावर, तिथल्या भौगोलिक परिस्थितीवर आणि संस्कृतीवर काय परिणाम झाला हे ही समजलं. एक एक साडी हातानं विणताना त्या महान अनामिक कलाकारांची बिनतोड कला, त्यामागची अविश्रांत मेहनत आणि त्या साडीवरची नक्षी तयार करताना केलेलं उत्कृष्ट नियोजन पाहिलं की थक्क व्हायला होतं आणि मुख्य म्हणजे ही गोष्ट समाजाच्या अर्थकारणाशी, विकासाशी, लोकांच्या सुख-दुखाशी निगडित आहे हे जेव्हा समजलं तेव्हा मात्र या विषयाचं महत्व समजलं. आपण उगाचच काहीतरी गुडी गुडी लिहीत नाही आहोत याचं समाधान मिळत गेलं. आणि याही विषयात अजून जास्त अभ्यासाची, आपल्या कला वैश्विक पातळीवर नेण्याची गरज आहे असं जाणवत गेलं.
याही पुढे जाऊन एक गोष्ट सारखी जाणवत राहते ती म्हणजे आपल्याला आपला विकास साधायचा असेल तर प्रत्येक वेळी पाश्चिमात्य लोकांकडे बघण्यापेक्षा आपल्याकडेच ज्या हस्तकला आहेत त्यांचा वैयक्तिक, ग्रामीण, शहरी, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर विकास आणि प्रचार केला पाहिजे.

27/10/19
दिवाळी लक्ष्मीपूजन

4 comments:

  1. अतिशय उत्तम आणि मुद्देसूद लेखन.....

    ReplyDelete
  2. छान आणि उत्तम लेख

    ReplyDelete
  3. Khup chan write kartes ....asch write karat ja ...aani aamhi tuze lekh wachnyas utsuk aahot

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर वर्णन ..... Mind-blowing 😎🙏

    ReplyDelete

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...