फार पूर्वी कुठून तरी कॉपी केलेल्या म्युझिक फोल्डर मधली गाणी ऐकायचा सपाटा लावलाय सध्या. त्यातली क्लासिकल फोल्डर मधली जवळपास सगळीच आता आता ओळख झालेली आहेत. त्यामुळे त्या सगळ्या आठवणी तश्या नव्या आहेत.
हिंदी गाणी काही माहीत आहेत, बरीचशी नवीन आहेत. ती गाणी ऐकायला लागले की मला रात्री 9 30 -10 वाजता रेडिओवर गाण्याचा कार्यक्रम लागलाय, मी जागून बायोकेमिस्ट्री, जेनेटिक्स असल्या कोणत्यातरी विषयाचा कॉलेजचा अभ्यास करतेस असा फिल यायला लागतो.
मराठी गण्यातली जवळपास सगळीच गाणी माझ्या अत्यंत आवडीची आणि लाडकी आहेत. आणि गंमत म्हणजे यातलं कडवं न कडवं माझं पाठ आहे, हे मला आताच जाणवतंय. माणिक बाईंची भक्तीगीतं लावली की पहाट झाल्याचा भास होतो. बाकी इतर सुमन, लता, अरुण दाते, हृदयनाथ, यांची भावगीतं लावली की मला माझे शाळेचेच दिवस आठवतात. ती गाणी ऐकताना निवांत दुपारी गूळ तूप पोळीचा लाडू चघळून चघळून खातेय असं वाटत राहतं.
पण बाबूजींची गाणी ऐकताना तर हाईटच होते. पूर्वी 'स्वर आले जुळूनी' या नावाची कॅसेट होती. मी तेव्हा अगदी पहिली किंवा जास्तीत जास्त दुसरीत असेन. मी अनेकदा शाळा सुटल्यावर मधल्या काकांच्या घरी जायचे आणि मग रात्री आठ साडे आठ वाजता धाकटा काका मला आमच्या घरी घेऊन यायचा. त्याच्याकडे तेव्हा त्या काळातली सुप्रसिद्ध मारुती 800 गाडी होती. तो मला त्या कारनं घरी आणायचा त्या 25-30 मिनिटांच्या त्या सावकाश प्रवासात ही एकच कॅसेट आलटून पालटून तो लावायचा. त्यामुळे आजही जवळपास 25/26 वर्षांनी ही गाणी ऐकताना मला पुन्हा त्या कार मध्ये मागच्या सीटवर बसून डोळे मिटून ही गाणी ऐकतेय की काय असा भास व्हायला लागतो. अगदी रस्त्यातून जाताना होणारे लहान लहान जर्क्स सुद्धा जाणवायला लागतात!
त्या वयानन्तर ही सगळी गाणी अनेकदा ऐकली असणार पण हेच ठसे मनावर अमीटपणे का टिकून राहावेत?
ही निवडक गाणी याच क्रमानं पुन्हा ऐकताना माझं बालपणच मला मला परत भेटायला आल्यासारखं वाटतंय..
अमृता देशपांडे
त्या वयानन्तर ही सगळी गाणी अनेकदा ऐकली असणार पण हेच ठसे मनावर अमीटपणे का टिकून राहावेत?
ही निवडक गाणी याच क्रमानं पुन्हा ऐकताना माझं बालपणच मला मला परत भेटायला आल्यासारखं वाटतंय..
अमृता देशपांडे
No comments:
Post a Comment