Friday 27 September 2019

गाणी मी आणि बाबा

यशवंत हो, जयवंत हो...

करकमळाच्या देठाभवती झिम्मा खेळे प्रीत बिलवरी...

किंवा सावळाच रंग तुझा,माझ्या मनी झाकळतो...

या ओळी कधीही ऐकल्या की मनात एक निवांतपणा, समाधानाची अनुभूती भरून राहते.
कोणतंही गाणं आपण अगदी पहिल्यांदा कधी ऐकलं ते आठवणं कधी कधी शक्यच नसतं कारण ही गाणी अपल्यासोबतच मोठी झालेली असतात. ही गाणी आपल्या जीवनाचा एक भागच होऊन जातात, त्यांना वेगळं काढताच येत नाही..
बाबांना गाण्याची विशेष आवड आहे. घरी  रेडिओ किंवा टेपरेकॉर्डर कायम चालूच असतो. लहान असताना कधी शाळेला सुटी असली की ते माझ्यासाठी कायम घरी असायचे. त्या वेळी या गोष्टीचं फार काही महत्व वाटलं नाही पण आता जेव्हा कुणाला काही देताना सर्वात मौल्यवान गोष्ट ही वेळ असते, तेव्हा या गोष्टीचं महत्व पटतं.
बाबा घरी असायचे तेव्हा मी दुपारी शाळेतून यायच्या वेळी गूळ, तूप पोळीचा लाडू करून ठेवायचे. शनिवारचा हा खास बेत असायचा.
टेप वर गाणं चालू असायचं...
पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये..

खाऊन झाल्यावर ते जे काम करत असतील त्यात मलाही सोबत घेऊन जायचे. आमची जाईची वेल खूप वाढली होती. त्यामुळे बेडरुमची एक खिडकी जवळपास उघडायचीच नाही. हीच वेल गच्चीपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे गच्चीत पालपाचोळ्याचा नेहमी खच पडायचा. गच्ची नेहमी झाडावी लागायची. दुपारी ते मला घेऊन जायचे गच्ची झाडायला.
रेडिओवर गाणी चालू असायची,

त्या तरुतळी विसरले गीत, हृदय रिकामे घेऊन फिरतो, जिथे तिथे ते गीत...
किंवा
स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी...

सगळ्या सगळ्या वातावरणातच एक निवांतपणा, शांतता ,भरल्या पोटी आलेला पेंगुळलेपणा आणि समाधान या भावना भरून राहिल्या होत्या.

त्या वेळी या गाण्याचे अर्थ कळायचे नाहीत. पण ही गाणी आजही पुन्हा ऐकली की पुन्हा त्याच भावना दाटतात.

पण इतक्या वर्षांनी आज मला हे लिहावंसं वाटलं कारण आज अभिनव त्याच वयात आहे आणि काल मी गुणगुणल्या नंतर तो ही माझ्यामागे म्हणायला लागला...
यशवंत हो, जयवंत हो...

1 comment:

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...