Sunday 4 August 2019

उत्सवप्रिय पैठणी


"लाल पैठणी रंग माझ्या चोळीला,
तुमी यावं सजण रंग होळीला.."
ही आनंद मोडक यांनी संगीत दिलेली, आशा भोसले यांनी गायलेली आणि ना. धो. महानोर यांनी लिहीलेली लावणी असो किंवा
"पैठणी बिलगुनी म्हणते मला,
जानकी वनवास संपला संपला…"
हे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चित्रीत केलेलं भावगीत असो, पैठणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दसरा-दिवाळीसारखे सण किंवा लग्नासारखे उत्सव उभे राहातात. पैठणी म्हटलं की डोळ्यासमोर भरजरी श्रीमंतीचा साज दिसायला लागतो. कोण्या कवीनं पैठणीला 'रेशमात आणि सोन्यात विणलेली कवीता' असं मनोहारी रुपक दिलंय!
पांढरी 'क्षीरोदक', काळी 'चंद्रकळा', पोपटी 'राघुपैठणी', निळी- 'निलीगुंजी', काळी-पांढरी – 'गुजरी पैठणी', लाल आणि हिरवी – 'पसीला पैठणी', लाल-काळी 'मिरानी पैठणी', गुलाबी- 'मोतिया पैठणी', 'फुसुंगी'जांभळी पैठणी, 'पोफळी'- पिवळी पैठणी अशी पारंपरिक नावं असलेली पैठणी आज या आणि आणखी अनेक रंगांच्या छटांमध्ये मिळते. शिवाय विरुध्द रंगाचा काठ असलेली पैठणी खास बालगंधर्वांसाठी त्यांच्या मागणीनुसार तयार केली जायची म्हणून या प्रकारच्या पैठणीला 'बालगंधर्व पैठणी' म्हणतात. या सगळ्या पैठण्यांचे रंग आणि त्यांच्या वरच्या वेगवेगळ्या आकारा-प्रकारांची नक्षी पाहिली की भान हरपून जायला होतं. ही पैठणी इतकी अस्सल असते की ती दोन-चारशे वर्ष म्हणजेच पिढ्यान् पिढ्या टिकते. या बाबतीत पैठणी याच नावाच्या कवितेत त्यांच्या आजीच्या पैठणीबद्दल शांता शेळके म्हणतात,
"कधीतरी ही पैठणी मी उरी धरते कवळून,  मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून…"
इतकी ही तरल पैठणी डोळे भरुन पाहात असतानाच पण मनात राहून राहून एक प्रश्न पडतो, की पैठणी नेमकी केव्हापासून आणि कुठे तयार व्हायला लागली? याचा इतिहास मोठा रंजक आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून ते इसवीसनाच्या तिसर्या शतकापर्यन्त महाराष्ट्रात सातवहनांचं राज्य होतं. त्यांची राजधानी ही प्रतिष्ठान म्हणजेच आजचं पैठण होतं. त्या काळी तिथे विद्या आणि कला यांची प्रगती राजाश्रयामुळे कळसाला पोहोचली होती. या काळात या राज्याचा सुती, रेशमी आणि जरीचा व्यवसाय इतका भरभराटीला पोचला होता की ते रोमन राज्याबरोबर व्यापार करत होते !
या काळात इथे जी हातमागावर रेशमी साडी विणण्याची कला विकसित झाली ती म्हणजेच आपली पैठणी. आपली पैठणी समुद्रमार्गे इतर देशांमध्ये पाठवायची पध्दतही मोठी लक्षवेधक होती. पैठणीची अगदी बारीक घडी करुन ती बांबूच्या पोकळ भागात बसवायची आणि दोन्ही बाजूंनी मेण घालून तो बांबू सीलबंद करायचा आणि त्याच्यावर त्याच्या आतमध्ये असलेल्या पैठणीचा तपशील लिहायचा. त्यानंतर ही पैठणी डहाणू किंवा नालासोपारा इथल्या बंदरांमधून समुद्रप्रवासाला निघायची !
या पैठणीची अनेक वैशिष्ट्यं आहेत. ती म्हणजे खरी पैठणी ही रेशमीच असते. तीचा आडवा धागा हा रेशमाचा आणि उभा धागा रेशीम आणि जरीचा असतो. पदरावर संपूर्ण जर वापरलेली असते. जर ही पूर्वी फक्त सोन्याची असायची आता सोन्याचं पाणी दिलेली चांदीचा धागा जर म्हणून वापरतात. या जरतारी वस्त्राला पूर्वी हिरण्यद्रपी म्हणत असत. आणि त्यातून त्यावर मोत्याचं काम केलेलं असेल तर त्याला मणिचिरा म्हटलं जायचं.
कालानुसार पैठणीवर चितारलेल्या नक्षीतही वेगवेगळ्या आकार-प्रकारात वाढ होत गेली. याची माहिती खूपच मजेशीर आहे. पैठणीचे काठ हे बारीक तिरक्या चौकटींचे असतात. तर त्यावर नारळाचे आकार काढलेले असतात. नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग उपयोगी असतो म्हणून आपल्या संस्कृतीत नारळाला अपार महत्व आहे, त्याला श्रीफळ म्हणतात. पदरावर मोर किंवा पोपटांची म्हणजेच राघू-मैनेची जोडी असते; कारण राघू-मैना हे सौभाग्याचं प्रतीक आहेत. पण पैठणीवरची सर्वात जूनी नक्षी म्हणजे आसावली. आसावली मध्ये वेलबुट्टी आणि फुला-पानांची नक्षी असते. याशीवाय बांगडीमध्ये असलेल्या मोराला यात बांगडीमोर म्हणतात. याच बरोबर पैठणीमध्ये रुईफूल, पंखा, कळस, आणि पाकळीची आकृती असते.  
पैठणीच्या संपूर्ण साडीवर जास्तीत जास्त नऊशे बुट्टे असतात. या बुट्ट्यांमध्येही पैसा, कुयरी, चांदणी, रुईफुल, पळसपान आणि चंद्रकोर असे अनेक प्रकार असतात.
त्या त्या काळच्या समाजाचं चित्रण कलांमध्ये नेहमीच दिसतं, किंवा आपण असंही म्हणू शकतो की ते समाजाचं प्रतिबिंब कलेमध्ये दिसलं नाही तर ती कला जिवंत रहात नाही. शालीवाहनाच्या काळातल्या पैठण्यांवर राजहंसाचं चित्र प्रसिध्द होतं तर यादवांच्या काळात सुवर्णकमळ प्रसिध्द होतं. अरंगजेबाच्या काळात त्याला अवडतात म्हणून पैठणीवरही पानं, फुलं आणि पक्षी यांची नक्षी आली. या प्रकारच्या पैठणीला अकबरी पैठणी म्हणतात. मुघल कालानंतर पैठणीचा हा व्यवसाय बराच कमी झाला.

त्यानंतर लयाला जाणार्या या व्यवसायाला पेशव्यांनी चालना दिली. पेशव्यांच्या बायका तर सण समारंभाला पैठणी वापरायच्याच; पण खुद्द माधवराव पेशव्यांना पैठणी विणकाम केलेली उपरणी वापरायला फार आवडायची.
पण तरीही पेशव्यांच्या नंतरच्या काळात पैठणी पुन्हा अस्ताला जायला लागली. कारण पेशव्यांच्या नंतर संपूर्ण हिंदुस्थानच ब्रिटीशांच्या अखत्यारित गेला होता. जवळपास सगळ्याच समृध्द कलांची या काळात अधोगती व्हायला लागली होती. आता पैठणमध्ये तयार होणारी जरआणि रेशीमही इथे तयार होईनासे झाले होते.
या नंतरचा काळ पैठणीसाठी अत्यंत खडतर होता. निजामशाहीच्या काळात येवल्यामध्ये जर आणि रेशीम तयार होत होते. त्यामुळे सतराव्या शतकात राघोजी नाईक या सरदारानं शामदास वालजी या गुजराती व्यापार्याच्या मदतीनं रेशमी साड्या विणण्याचा व्यवसाय जवळच्याच येवला या गावी वसवला. नंतर येवल्यात पैठणीही तयार व्हायला लागली. तेव्हापासून येवला हे पैठणी निर्मीतीचं प्रमुख केंद्र झालं आहे.
अगदी पूर्वी पैठणी सुती धाग्यात विणली जायची. त्यानंतर गर्भरेशमात विणली जायला लागली. म्हणजे आडवे धागे सुती आणि उभे धागे रेशमी आणि जरीचे. त्यानंतर मात्र पैठणी ही फक्त रेशमातच विणली जाते.
एक पैठणी विणायला कमीतकमी दीड-दोन महिने ते दोन वर्षांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. हा कालावधी तिच्यावर चितारायच्या नक्षीवर आणि तिच्यात वापरायच्या वेगवेगळ्या धाग्यांच्या रंगांवर अवलंबून असतो. ही नक्षी जितकी नाजूक आणि रंग जितके जास्त तितकी ती चितारायला अवघड आणि वेळ घेणारी असते. हे सगळं करताना कारागीरांच्या अनुभवाचं आणि कौशल्याचं कसब पणाला लागतं. याच पध्दतीनं मग या साडीची किंमतही काही हजार ते काही लाखांपर्यत वाढत जाते. यावरुनच पैठणमध्ये एक रास्त म्हण तयार झाली आहे, "खावं पोटभर आणि विणावं बोटभर!!"
सोन्या-चांदीच्या धातूपासून केसाइतकी बारीक तार तयार करणारे तारकशी यांची एक गल्लीच पूर्वी पैठणमध्ये होती. आता मात्र हे कसब असणारे लोक मिळतच नाहीत. त्यामुळे आता पैठणी तयार करण्यासाठी कच्चा माल कर्नाटक आणि गुजरातमधून आणला जातो.
इतकं सगळं जरतारी आणि भरजरी असलं तरी जी लोकं पैठण आणि येवल्यात पैठणी विणतात त्यांना आयुष्यात एकदा तरी ही पैठणी नेसता येत असेल का हा प्रश्न मात्र तसाच उरतो; कारण अनेक दिवस, अनेक महिने आणि काही वेळा वर्षभर मेहनत करुन एक पैठणी विणून होते, त्या पैठणीची किंमत वीस हजारांपासून तीन लाखांपर्यंत जाते. पण या कामाचा मोबदला मात्र या कामगारांना महिन्याला तीन-चार हजारांच्यावर मिळत नाही. काय हा विरोधाभास !
त्यातुन हे कामगार फार काही शिकलेले नसतात त्यामुळे आपल्या कलेचं योग्य तर्हेनं मार्केटिंग कसं करावं हे त्यांना समजत नाही. त्यातून मशीनवर तयार होणारी पैठणी कमी किमतीत मिळायला लागल्याने यांच्या पोटावरच पाय आलेला आहे.
हे सगळे कुशल कारागीर म्हणजे महाराष्ट्राची दौलत आहेत. हे अस्सल कलाकार दोन हजार वर्षापूर्वीच्या कोण्या अनामिक कलाकाराचा वारसा जपत, आयुष्याच्या लढाईशी एकदिलानं लढून ते हा महावस्त्र विणण्याचा घेतलेला वसा आजही पाळताहेत. आज मात्र त्यांना राजाश्रय आणि लोकाश्रय या दोहोंची गरज आहे. नाहीतर हे महावस्त्र जीर्ण व्हायला वेळ लागणार नाही.
(पूर्व प्रसिद्धी दैनिक प्रभात)
अमृता देशपांडे
amrutadeshpande.1414@gmail.com
  

No comments:

Post a Comment

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...